यवतमाळ : देशात आज मूठभर श्रीमंतांच्या हाती संपत्ती एकवटली आहे. देशातील हा सामाजिक व आर्थिक विरोधाभास एक व्यक्ती, एक मूल्य, एक मत एवढ्याने कमी होणार नाही. त्यासाठी सर्व घटकांमध्ये सामाजिक व आर्थिक पातळीवर समानता निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी सर न्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

येथील विद्या प्रसारक मंडळद्वारा संचालित स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात शनिवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विधी महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्या. अनिल किलोर, न्या. वृषाली जोशी, पालकमंत्री संजय राठोड, बार कॉन्सिल ऑफ इंडियाचे ॲड. आशिष देशमुख, न्या. शेखर मुनघाटे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, ॲड. फिरदोस मिर्झा आदी उपस्थित होते.

राज्यघटना हा सर्वांचा धर्मग्रंथ

पुढे बोलताना न्या. भूषण गवई म्हणाले, भारतात धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक सर्वत्रच आढळते. त्यामागे आपल्या देशाच्या राज्यघटनेची प्रेरणा असून, राज्यघटना हा सर्वांचा धर्मग्रंथ आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरून वाटचाल

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांनी यावेळी बोलताना, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरून चालत देशातील दीनदुबळ्या, वंचित घटकांना न्याय दिला, असे गौरवोद्गार काढले. यावेळी बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी, स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून घडणारे विद्यार्थी वंचिताना न्याय मिळवून देतील, असा विश्वास व्यक्त केला. न्या. अनिल किलोर यांनी, विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वकिली सुरू करण्यापूर्वी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अनुभव घेऊन या क्षेत्रात काम करावे, असा सल्ला दिला.

कार्यक्रमात जिल्ह्यातील ज्येष्ठ विश्वीज्ञांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेळगावकर यांनी केले. आभार संस्थेचे सचिव प्रकाश चोपडा यांनी मानले. कार्यक्रमास न्यायिक क्षेत्रातील मान्यवर, विधी शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरोधाची पार्श्वभूमी; पण कार्यक्रम सुरळीत

न्या. भूषण गवई यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्यानंतर आंबेडकरी चळवळीत असंतोष आहे. शहरातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी न्या. भूषण गवई यांच्या स्वागताचे फलक फाडले. आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी न्या. गवई यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने गवई यांच्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट होते. समाज माध्यमातून न्या. गवई यांचा कार्यक्रम रद्द झाल्याचा संदेश फिरत होता. मात्र गवई यांच्या यवतमाळ दौऱ्यात कुठेही व्यत्यय आला नाही. विशेष म्हणजे, या दौऱ्यावरून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती प्रशासनास होती. मात्र संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडल्याने पोलिसांनीही सुटकेचा श्वास घेतला.

कार्यक्रमादरम्यान धुळीचे वादळ

येथील अमोलकचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान अचानक सोसाट्याचा वारा व धुळीचे वादळ आल्याने पाच ते १० मिनिटे न्या. गवई यांच्यासह पाहुण्यांना धूळ अंगावर झेलत बसावे लागले. वादळ थांबत नसल्याचे बघून सुरक्षा यंत्रणेच्या सूचनेवरून कार्यक्रम नजीकच्या सभागृहात हलविण्यात आला. त्यानंतर कार्यक्रम सुरळीत पार पडला.