नागपूर : गेल्या दीड वर्षांपासून नागपूर महापालिकेत प्रशासक असून राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर निधी वाटप केला जात आहे. निधी वाटपात पक्षपात केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील विविध समस्या, दलित वस्ती सुधार योजनेच्या अंमलबजाणीत होणारी दिरंगाई, अग्निशमन दलाचा हलगर्जीपणा या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. यामध्ये प्रभागात निधी वाटपामध्ये पक्षपात केला जात आहे. सत्ताधारी पक्षांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येते. ज्या ठिकाणी अन्य पक्षाचे नगरसेवक होते त्या प्रभागात निधी देण्यात येत नाही. झोपडपट्टी व दलित वस्ती सुधारअंतर्गत होणारी कामे निधीअभावी थांबवण्यात आली आहेत. दलित वस्ती सुधार निधी थांबवता येत नाही. त्यामुळे तो निधी तातडीने वितरित करून विकास कामे सुरू करावी.

हेही वाचा – संविधानाच्या सन्मानार्थ प्रथमच नागपुरात पथसंचलन व गणसभा

पूर्व नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी आग लागली होती. अग्निशमन दलासकडे तक्रार केल्यानंतर आगीचा बम्ब पाठवण्यास बराचा उशीर झाला. या विलंबाबाबत माहिती घेतली असताना गाडीमध्ये पाणी भरले नव्हते, असे समजले. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे पेठे म्हणाले.

हेही वाचा – राष्ट्रमाता जीजाऊंच्या जन्मस्थळाचा वीजपुरवठा खंडित, ‘सीसीटीव्ही’ बंद…

यावेळी पंकज ठाकरे, रेखा कुपाले, रविनिश पांडे, महेंद्र भांगे, अरशद सिद्दिकी, प्रशांत बनकर,अश्विन जवेरी, आशुतोष बेलेकर, शरद शाहु, जाकिर शेख, सुनिता खत्री, प्रकाश मेश्राम, सुफी टायगर, पवन गावंडे उपस्थित होते.