पोलीस, महसूल, उत्पादन शुल्क खात्याची तपासणी पथके

मावळत्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांच्या स्वागताला संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तरुणाईच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी  पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही छोटय़ा-मोठय़ा हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरची रात्र उत्साहात जावी म्हणून रंगारंग कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी मुंबईवरून कलाकार येणार आहे. पाचशे रुपयांपासून तर पाच हजार रुपयांपर्यंत काही ठिकाणी तिकीट दर आहे.

मद्य आणि नृत्याचीही सोय येथे असणार आहे. फक्त हॉटेल्सच नव्हे तर काही खासगी ठिकाणीही रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. नवीन वर्षांनिमित्त बाजारपेठाही सजल्या आहेत. मॉल्समध्ये ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.

मद्यप्रेमींसाठी वर्षांची शेवटची रात्र ही पर्वणी ठरते. दारू दुकानेही उशिरा रात्रीपर्यंत सुरू राहणार असून बार आणि रेस्टॉरन्टमध्येही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

फक्त हॉटेल्स किंवा बार, रेस्टॉरेन्टमध्येच नव्हे तर विविध निवासी संकुलातही जल्लोषाची तयारी सुरू आहेत. डी.जे. लावून नृत्य करीत धमाल करण्यासाठी काही अपार्टमेन्ट सज्ज झाले आहेत.

युवकांच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी नाकेबंदी करणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रात्री१२ वाजल्यानंतर नागरिकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

फुटाळ्यावर वाहन बंदी

डिसेंबरला फुटाळा तलाव आणि शंकरनगर चौक ते लॉ कॉलेज चौक या दरम्यान होणारी तरुणाईची गर्दी लक्षात घेता या भागात वाहने नेण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात एक अधिसूचना जारी करून या बाबतची माहिती दिली आहे. मावळत्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी फुटाळा तलाव आणि वेस्ट हायकोर्ट रोडवर तरुणाईंची एकच गर्दी होते. त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वरील उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार फुटाला तलाव परिसरात तेलंगखेडी हनुमान मंदिर, वायुसेना नगर आणि फुटाळा वस्ती या बाजूकडून जोडणाऱ्या रस्त्याने सायकल व रिक्षांसह सर्व वाहनांच्या रहदारीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

फुटाळा परिसरात राहणारे लोक हे त्यांची वाहने तेलंगखेडी हनुमान मंदिरापासून फुटाळा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने तसेच फुटाळा तलाव ते वायुसेना नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभी ठेवू शकतात. वेस्ट हायकोर्ट मार्गावरील लॉ कॉलेज चौक ते शंकर नगर चौक या दरम्यान सर्व वाहनांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे. ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून १ जानेवारी २०१६ च्या सकाळी ६ वाजेपर्यंत ही व्यवस्था असणार आहे, असे पोलिसांकडून कळवण्यात आले आहे.

मनोरंजन कार्यक्रमाची रेलचेल

मनोरंजन कार्यक्रमांवरही लक्ष

विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही शहरात आयोजित करण्यात आले आहे. विशेषत: बडय़ा हॉटेल्सनी यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. हे सर्व कार्यक्रमासाठी शुल्क आकारण्यात येत आहे. त्यासाठी रितसर जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाकडून परवानगी घेतली जात आहे. मात्र अनेक वेळा कर चुकवण्यासाठी आहे त्या पेक्षा कमी तिकीट दर दाखविले जातात व ग्राहकांकडून अधिक रक्कम वसूल केली जाते. यावर लक्ष ठेवण्यासाठी करमणूक कर विभागाने ६ पथके तयार केली आहे. या पथकात तीन सदस्य असणार आहे. प्रत्येक मनोरंजन कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन ही पथक भेट देणार आहे व दिलेल्या परवानगीनुसारच तिकीट दर आणि इतर बाबी आहे किंवा नाही याची खातरजमा हे करणार आहे.

दारूविक्रीवर नजर

३१ डिसेंबरला दारू विक्रीची दुकाने उशिरापर्यंत सुरू राहणार असली तरी यावर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथके तयार केली आहेत. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने विविध हॉटेल्स आणि इतरही ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. तेथे मद्याची व्यवस्था केली जाते. या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात देशी-विदेशी बनावट मद्य शहरात आणले जाते. त्याची तपासणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक शाखेने ८ पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात तीन कर्मचारी राहणार असून ते विविध ठिकाणी जाऊन तपासणी करणार आहेत.