नागपूर : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे हावडा-मुंबई आणि हावडा-अहमदाबाद या दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागला असून, काही गाड्यांना मोठा विलंब होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ही दुर्घटना बिलासपूर–कटनी रेल्वे विभागातील लाल खदान परिसरात दुपारी साधारण चारच्या सुमारास घडली. कोरोबा पॅसेंजर (क्रमांक ६८७३३) आणि एका मालगाडीची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत पॅसेंजर गाडीचे काही डबे रुळांवरून घसरले. अपघातात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून, दोन डझनहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ बिलासपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे.
धडकेनंतर रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्स, सिग्नल प्रणाली आणि रुळांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या बचाव आणि दुरुस्ती पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन सेवा यंत्रणा बचावकार्यात गुंतली असून, रुळांवरून नुकसानग्रस्त डबे हटवण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत सिग्नल बिघाड किंवा मानवी चूक ही अपघाताची संभाव्य कारणे असल्याचे समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या अपघातामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या हावडा-मुंबई आणि हावडा-अहमदाबाद गाड्यांवर परिणाम झाला आहे. काही गाड्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले असून, प्रवाशांना रेल्वे हेल्पलाइनवर संपर्क साधून अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे विभागाने प्रवाशांना दिलासा देत सांगितले की, सर्व आवश्यक मदत व सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे काम सुरू असून, मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिली.
लालखदान (बिलासपूर)मध्ये मोठा अपघात झाला आहे. मेमू लोकल आणि मालगाडी यांची टक्कर झाली आहे. यात शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. तर अनेक जण ठार झाले आहे. मदत व बचाव कार्य सुरू आहे.
