महेश बोकडे, लोकसत्ता 

नागपूर : शासनाने राज्यातील सगळय़ा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या ‘बायोमेट्रिक’ हजेरीला पुन्हा सुरुवात केली आहे; परंतु  तरीही एका महाविद्यालयातील शिक्षक उसनवारीवर दुसऱ्या महाविद्यालयात पाठवण्याचा प्रकार सुरूच आहे.   

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत राज्यात २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यासह सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये पूर्वी भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) अखत्यारीत येत होती. कालांतराने ‘एमसीआय’ बंद करून केंद्र सरकारने ‘एनएमसी’च्या अखत्यारीत हे महाविद्यालय दिले. ‘एमसीआय’ने येथील ‘बायोमेट्रिक’ हजेरीला दिल्लीतील ‘एमसीआय’च्या ‘सव्‍‌र्हर’शी जोडण्याचा निर्णय घेतला होता. या वेळी असे करण्यामागचे कारण शिक्षकांना इतरत्र कार्यरत दाखवण्याला पायबंद घालणे आहे, असे सांगण्यात आले होते.    

काही महाविद्यालयांत ‘बायोमेट्रिक’ पद्धतीची हजेरीही सुरू झाली; परंतु सर्व महाविद्यालयांचे ‘सव्‍‌र्हर’ जोडले गेले नाहीत. दरम्यान, करोनाकाळात  ‘बायोमेट्रिक’ हजेरी बंद झाली. करोनाची लाट ओसरल्यावर ती पुन्हा सुरू झाली. परंतु आता यावर ‘एनएमसी’चे नियंत्रण नाही. ज्या महाविद्यालयात भारतीय वैद्यकीय परिषदेचे निरीक्षण सुरू असते तिथे हे शिक्षक उसनवारीवर पाठवले जातात. त्यामुळे हा प्रकार कधी थांबणार, हा प्रश्न वैद्यकीय शिक्षक संघटनांकडून विचारला जात आहे.

एकाच वेळी निरीक्षण हवे एखाद्या रुग्णाची प्रकृती अचानक खालावल्यास डॉक्टरांना केव्हाही रुग्णालयात धावावे लागते. डॉक्टर २४ तास सेवेवर असताना त्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी योग्य नाही. बायोमेट्रिक हजेरी घेतली तरी त्यावर ‘एनएमसी’चे नियंत्रण नाही. त्यामुळे एकाच शिक्षकाला इतर महाविद्यालयात रिक्त जागा असल्यास तेथे काही दिवस कार्यरत दाखवले जाते. हा गैरप्रकार थांबवण्यासाठी देशातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात ‘एनएमसी’ने एकाच वेळी निरीक्षण करण्याची गरज आहे.

डॉ. समीर गोलावार, सचिव, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व कमी दरात शिक्षण मिळते. म्हणून शासनाकडून येथील ‘एमबीबीएस’ व पदव्युत्तरच्या जागा वाढवण्याचा आग्रह असतो. येथील एका महाविद्यालयातून शिक्षकांची इतरत्र बदली केल्यास सुमारे वर्षभर हे शिक्षक तेथेच कार्यरत दाखवले जातात. उसनवारीच्या नावाने कोणतेही गैरप्रकार होत नाहीत. सगळी प्रक्रिया नियमानुसार होते.  – डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय संचालक, मुंबई