वर्धा : मनुष्यजीव अस्तित्वात येण्यापूर्वी ब्रह्मांड रचना झाल्याचे सांगितल्या जाते. म्हणजेच पशुपक्षी, वृक्षवल्लरी असे जीव प्रथम. त्यामुळे योग किंवा अन्य विद्या या नंतरच. योगविद्या प्राचीन आणि आता रामदेवबाबा व अन्य माध्यमातून लोकप्रिय झालेल्या या विद्येचे आसन थक्क करतात. पण त्यापेक्षा तासंनतास एका पायावर उभे असणाऱ्या पक्ष्यांची योगमुद्रा ही पण अतीप्राचीन म्हणता येईल. गंमतीचा भाग सोडला तर हे असे एका पायावर उभे राहणारे पक्षी विस्मयचकित करतात, हे निश्चित.

एका पायावर उभे राहणारे पक्षी.

निसर्ग निरीक्षण करतांना बदक, बगळे, फ्लेमिंगो किंवा अन्य पक्षी एका पायावर उभे असल्याचे किंवा चक्क झोप घेत असल्याचे अनेकांनी बघितले. ही त्यांची सवय की शिकारी मुद्रा असे नसून यामागे निसर्गाचे एक विज्ञान असल्याचे सत्य आहे. बहार नेचर या पक्षीप्रेमी संघटनेचे मार्गदर्शक व जिवशास्त्रज्ञ दर्शन दुधाने यावर प्रकाश टाकतात.

तापमान नियंत्रित ठेवणे

पक्षी अभ्यासकांच्या सांगण्यानुसार पक्षी एका पायावर उभे राहून आपल्या शरीरातील उष्णता टिकवून ठेवतात. पायावर पिसे नसल्याने शरीरातील उष्णता वेगाने बाहेर पडते. विशेषतः पाण्यात राहणाऱ्या पक्ष्याबाबत. एका पायावर उभे राहून पक्षी पंखाच्या ऊबदारपणात सुरक्षित होतात. शरीराचे तापमान संतुलित राहते. एका पायावर उभे राहून ते थकत नाही तर त्यांची या योगमुद्रेत त्यांची ऊर्जा वाचते.

शिकार करण्याची युक्ती

अनेक पक्षी पाण्यात स्तब्ध राहतात तेव्हा पाण्यातील मास्यांना तो पक्षी नसून एखादी वनस्पती असल्याचा भास होतो. परिणामी मासे या पक्ष्याच्या जाळ्यात फसतात. ही पक्ष्यांची जगण्याची योगविद्या म्हटली पाहिजे. मानवासाठी जी मुद्रा अत्यंत कठीण ती या पक्ष्यांसाठी निसर्गाने बहाल केलेली एक जगण्याची कला ठरते.

हा विश्रांतीचा प्रकार.

बगळे पाण्यात शिकार करतांना एका पायावर स्थिर उभे असतात. त्यांची ऊर्जा वाचते आणि शिकार जवळ येण्याची शांतपणे वाट बघू शकतात. त्यांनाही विश्रांतीची गरज असते. बराच वेळ उभे राहल्यावर पक्षी एक पाय वर घेतात व दुसऱ्या पायावर भार टाकतात. काही वेळाने पाय बदलतात, हे असे कुरळ ( Eurasian Curlew ) व लाल गाठीची टिटवी ( Red Watteled Lapwing ) या पक्ष्यांची मुद्रा टिपणारे दर्शन दुधाने सांगतात. पोथरा प्रकल्प व तापी नदीकाठी त्यांनी या मुद्रा टिपल्या.

असा आहे अभ्यास

यामागची मिमांसा करतांना दुधाने म्हणतात की शरीरातील उष्णता टिकवणे, ऊर्जा बचत करणे, स्नायूंना विश्रांती देणे, झोप घेणे आणि पर्यावरणाशी जुळवून घेणे अशी अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. २०१७ साली अमेरिकेतील यंग हुई चैंग व लेना टिंग या संशोधकांनी फ्लेमिंगोच्या वर्तनाचा अभ्यास केला. या संशोधनात असे आढळून आले की फ्लेमिंगो एका पायावर उभे असताना त्यांच्या शरीराचा गुरुत्वमध्य (Center of Gravity) अशा प्रकारे संतुलित राहतो की स्नायूंवर अत्यंत कमी ताण येतो. त्यामुळे त्यांना जवळजवळ कोणतीही अतिरिक्त ऊर्जा खर्च न करता बराच वेळ एका पायावर उभे राहणे शक्य होते.