scorecardresearch

वीजवाहिन्यांपासून पक्षी आता सुरक्षित; भारतीय वन्यजीव संस्थेचे उपकरण लवकरच वापरात

अंतरापासूनच पक्ष्यांना उच्चदाब वीज वाहिन्यांकडे येण्यास रोखता येते. हवामानात कोणताही बदल झाला तरीदेखील ते काम करते.

भारतीय वन्यजीव संस्थेचे उपकरण लवकरच वापर

नागपूर : उच्चदाब वीज वाहिन्यांना धडकून माळढोकसह इतरही दुर्मीळ पक्षी नामशेष होत आहेत. याबाबत काही स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने संभाव्य ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे तसेच शक्य नसेल तेथे वीज वाहिन्यांपासून पक्ष्यांना परावृत्त करणारे ‘बर्ड डायव्हर्टर्स’ बसवण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय वन्यजीव संस्था देहरादून, येथील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच स्वदेशी तंत्रज्ञानाचे ‘बर्ड डायव्हर्टर्स’ तयार करण्यात आले असून लवकरच त्याच्या वापराची प्रक्रिया सुरू होणार आहे.

 ‘बर्ड फ्लाइट डायव्हर्टर्स’ एकदा चार्ज केल्यानंतर शंभर तास काम करू शकतात आणि त्यांच्या बॅटरीचे आयुष्य दोन वर्षाचे असते. दिवसाच नाही तर रात्रीदेखील ते तेवढ्याच सक्षमपणे कार्य करते. २०० मीटरपासून ते दृश्यमान आहे. म्हणजेच या

अंतरापासूनच पक्ष्यांना उच्चदाब वीज वाहिन्यांकडे येण्यास रोखता येते. हवामानात कोणताही बदल झाला तरीदेखील ते काम करते. बरेचदा पक्षी वीज वाहिन्यांमधून उडतात, कारण त्यांना स्पष्टपणे त्या दिसत नाहीत. मोठे पक्षी त्यात अडकतात. ते त्वरित दिशा बदलू शकत नसल्याने मृत्युमुखी पडतात. जमिनीवरील वीजवाहिन्या पक्ष्यांसाठी तीनप्रकारे धोकादायक ठरतात. वीजप्रवाहाचा धोका, वीजवाहिन्यांशी धडक होण्याचा धोका, शिवाय अधिवास कमी होण्याची दाट शक्यता असते. ‘बर्ड डायव्हर्टर्स’ हे अतिशय उच्च दर्जाचे उपकरण असून त्याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

यशस्वीपणे स्थापित…

पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून १६ हजार ६८३ ‘बर्ड डायव्हर्टर्स’ मागवण्यात आले आणि ते यशस्वीपणे स्थापित करण्यात आले. तसेच माळढोकसह इतरही दुर्मिळ पक्ष्यांच्या वीजवाहिन्यांशी होणाऱ्या धडकेबाबत न्यायालयाचे दार ठोठावणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून यांनी देखील हे उपकरण मागवले असून ते यशस्वीपणे स्थापित करण्यात आले आहे.

काय होणार?

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत २०१९ मध्ये ए अँड एस क्रिएशन्सने स्वदेशी तंत्रज्ञानाचे स्वदेशी ‘बर्ड फ्लाइट डायव्हर्टर्स’ तयार करण्यास सुरुवात केली. उच्चदाब वीज वाहिन्यांजवळ पक्षी न येता तेथूनच ते दुसरीकडे वळतील, त्यामुळे त्यांचा जीव वाचेल, अशा पद्धतीचे हे ‘डायव्हर्टर्स’ वीज वाहिन्यांवर बसविण्यात येणार आहेत.

हे यंत्र किफायतशीर असून बळकट साहित्यापासून ते तयार करण्यात आले आहे. भारतात हवामानाच्या बदलणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत ते काम करू शकेल. तशा चाचण्या घेण्यात आल्या असून त्या यशस्वी झाल्या आहेत. वीजवाहिन्यांवर हे उपकरण स्थापित करण्याची प्रक्रिया देखील अतिशय सोपी आहे. -सुमित सभरवाल, अध्यक्ष, ए अँड एस क्रिएशन्स.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Birds safe power lines indian wildlife institute equipment coming soon akp

ताज्या बातम्या