देवेश गोंडाणे
नागपूर : अधिक दुग्धक्षमतेच्या गायींमधून स्त्रीबिजे काढून उच्च प्रतीच्या वळूंच्या विर्याद्वारे फलन व नंतर कमी दुग्धक्षमतेच्या गायींमध्ये त्या गर्भाचे प्रत्यारोपण करून त्याद्वारे अधिक दूध देणाऱ्या कालवडी जन्माला घालण्याचा प्रयोग नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘आयव्हीएफ’ प्रयोगशाळेत करण्यात आला. या तंत्रज्ञानाद्वारे कमी वेळात उच्च दुग्धक्षमतेचे गोधन तयार करणे शक्य झाले असून नुकताच तीन कालवडींचा जन्म झाला आहे. महाराष्ट्र शासन व विद्यापीठाच्या प्रयत्नाने आता हे तंत्रज्ञान लवकरच सामान्य शेतकरी आणि पुशपालकांसाठी उपलब्ध होणार असून यामुळे दुभत्या जनावरांची संख्या वाढून दूध उत्पादनातही वाढ होणार आहे.
कमी दूध देणारी जनावरे आणि करोनाकाळात घसरलेल्या दुधाच्या दरामुळे राज्याच्या दूध संकलनात ९० लाख लिटरने घट झाल्याचे नुकतेच समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ‘माफसू’च्या या यशस्वी प्रयोगामुळे पशुपालकांना अधिक दूध देणारी जनावरे उपलबध होणार आहे. एक गाय तिच्या आयुष्यात केवळ ८ ते १० वासरांना जन्म देऊ शकते. मात्र, आता उच्च दर्जाच्या गीर गायीच्या गर्भाशयामध्ये कृत्रिम रेतनाद्वारे भ्रूण तयार करून ते कमी दुग्ध उत्पादन क्षमता असणाऱ्या गायीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित करता येणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) भ्रूण प्रत्यारोपण केलेल्या गायींनी नैसर्गिकरित्या वासरांना जन्म दिला. या यशस्वी प्रयोगामुळे आता उच्च दर्जाच्या एका गीर गायीपासून वर्षांला ५० भ्रूण तयार करता येतील, असा विश्वास या प्रयोगाचे प्रमुख व पशुप्रजनन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुनील सहातपुरे यांनी व्यक्त केला. आपल्या देशात दुभत्या जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, जगाच्या तुलनेत दूध उत्पादनाचा वाटा मात्र कमी आहे. त्यास उच्च जातीच्या गायी-म्हशी नसणे हे एक कारण आहे. या प्रयोगामुळे आता उच्च दर्जाच्या देशी गायींची निर्मिती सहज करता येईल. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या गीर प्रजातीच्या दाता गायीची अधिकाधिक वासरे कमी कालावधीत यशस्वीरित्या निर्माण करून उच्चप्रतीच्या देशी गोवंशाचे संवर्धन करता येणार आहे.
शेतकऱ्यांकडेही यशस्वी प्रयोग
हा प्रयोग गडचिरोली, वर्धा, नागपूर गोरक्षणसह काही सधन शेतकऱ्यांकडेही करण्यात आला. पहिल्या प्रयत्नातच या सर्व भागांमध्ये प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती पशुप्रजनन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुनील सहातपुरे यांनी दिली. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी याचा लाभ घेत अधिक दूध देणारी जनावरे पाळावीत, असे आवाहन केले जात आहे. भविष्यात शिबिरे घेऊन शेतकऱ्यांना याची अधिक माहिती दिली जाणार आहे.