अकोला : बिश्नोई टोळीकडून अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना पुन्हा एकदा धमकी आली आहे. काँग्रेस नगरसेवकाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून धमकी देण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. प्रचंड गदारोळ झाला. या सर्व प्रकरणांवर साजिद खान पठाण यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण विधान केले.
बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर याने आमदार साजिद खान पठाण यांना दुसऱ्यांदा धमकी देण्यासाठी फोन केला. या अगोदर बिश्नोई टोळीतील हस्तक शुभम लोणकर याने आमदार पठाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून १७ फेब्रुवारी २०२६ ला दुपारी ३ वाजता संपर्क साधत ‘‘दोन दिवसांत १० कोटी रुपये दे, अन्यथा तुझा गेम करू, अशी धमकी दिली होती. त्यानंतर आता धमकीचा फोन काँग्रेसचे नगरसेवक आकाश कावडे यांना करण्यात आला. बिश्नोई टोळीतील शुभम असल्याचे सांगत, ‘‘साजिद पठाण यांनी आमचे ऐकले नाही, तर २ जुलै रोजी दुपारी २ वाजता काय होते ते दाखवून देतो,’’ अशी धमकी दिली.
साजिद खान पठाण काय म्हणाले?
या धमकी प्रकरणाचे पडसाद पावळी अधिवेशनात उमटून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यावेळी साजिद खान पठाण म्हणाले, ‘‘या विषयाचे राजकारण करायचे नाही. पहिल्यांदा धमकी आली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: रात्री १२ वाजता फोनवरून संवाद साधला. त्यांनी संरक्षणाची जबाबदारी घेतली. मात्र, वारंवार एका आमदाराला धमकी येते, हे सुरू काय आहे? परवा मुख्यमंत्र्यांनी म्हटले ही टोळी संपवून टाकू आणि त्यानंतर काल रात्री ८.३० वाजता पुन्हा धमकी आली. मी या धमक्यांना घाबरत नाही. घाबरलो असतो, तर घरातून बाहेरच पडलो नसतो.’’
सुरक्षा नको, मंदिरासाठी निधीच द्या
धमकी आल्यानंतर आज थेट सभागृह गाठून आपल्याशी संवाद साधत आहे. या टोळीने राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या केली. माझी सुद्धा ते हत्या करू शकतात. मरण्यापूर्वी अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरासाठी मी मागितलेला निधी द्यावा. त्याठिकाणी भव्य मंदिर उभारले जावे, अशी मागणी आ. साजिद खान पठाण यांनी केली. सुरक्षा नको, मंदिरासाठी निधीच द्या. आम्ही प्रेमाने राहू इच्छतो, असे देखील ते म्हणाले. धमकी प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
