नागपूर : राज्य सरकार ओबीसीचे आरक्षण देण्यात अपयशी ठरली आहे. या विरोधात उद्या बुधवारी राज्यातील विविध जिल्ह्यांत, तालुका स्तरावर भाजपच्या वतीने एक हजार ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती माजी मंत्री व भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपुरात दिली. ओबीसी आरक्षण गेले यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधि आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचे सांगितले. हा विभाग कुणाकडे आहे हे सर्वांना माहीत आहे. किमान सहा जिल्ह्यांचा डाटा तयार केला असता तर तिथे आरक्षण देता आले असते. ओबीसी आयोगाचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्य सचिवांनी एकही बैठक घेतली नाही. मुख्य सचिवांवर बैठक न घेण्याबाबत दबाव आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.