अमरावती : शहरातील मध्यवर्ती भागात ‘विचारा इस्लामविषयी?’ या मजकुराचे अनेक फलक झळकले आहेत. या नव्या फलकांमुळे शहरात मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपचे नेते आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी यावर तीव्र आक्षेप घेत, हे धर्मांतरणाचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे, दरम्यान आज डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वातील भाजप कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचले. नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने वातावरण तापले.
अमरावती शहरातील पंचवटी चौकासह इतर प्रमुख चौकांत ‘इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर’ (आयआयसी) या संस्थेचे फलक सध्या लक्ष वेधून घेत आहेत. या फलकांवर ठळकपणे ‘विचारा इस्लामविषयी?’ असा मजकूर लिहिलेला आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात ‘आय लव्ह मोहम्मद’चे फलक लागल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. आता पुन्हा याच स्वरूपाचे फलक लागल्याने भाजपने यावर आक्षेप घेतला आहे.
डॉ. अनिल बोंडे यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि इतर पदाधिकारी आज पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचले. त्यावेळी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया हे कक्षात उपस्थित नव्हते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. गणेश शिंदे यांनी पोलीस जागरूक असून प्रकरणी तपासून निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यावर पोलिसांना हे फलक दिसत नसतील, तर पोलीस जागरूक नाहीत, तर भाजपचे कार्यकर्ते जागरूक आहेत. त्यामुळेच हे गंभीर प्रकरणी पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस आयुक्त कार्यालयात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारची अपेक्षा नाही, अशा शब्दात डॉ. अनिल बोंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
पोलीस प्रशासन यासंदर्भात गंभीर नाही, असा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला. अशा प्रकारचे फलक लावण्याची हिंमत कशी काय होते. त्यांच्या पाठीशी कोण लोक आहेत. केवळ एका माणसाला पकडून चालणार नाही, त्याला कोणाचा पाठिंबा आहे, मोठी शक्ती त्याच्या पाठीशी आहे, असे शिवराय कुळकणी यांनी सांगितले. त्यावर आम्हीही जय श्रीरामचे फलक ठिकठिकाणी लावू, असे एका कार्यकर्त्यांने म्हटले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातच ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण तापले.
