बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून वाईचे (जिल्हा सातारा) आमदार व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची नियुक्ती झाली. यावरून भाजपमध्ये नाराजी दिसून आली. पाटील यांच्या पहिल्या दौऱ्यातच स्वागताला भाजपचे नेते आणि पदाधिकारी फिरकलेच नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाण्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी मध्ये स्पर्धा रंगली, शिंदे गटाने अखेरच्या टप्प्यात माघार घेतली. पक्षाचा गढ असलेल्या बुलढाण्याचे पालकत्व भाजपकडेच राहावे यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले .मात्र संधी अजितदादा गटाला मिळाली. मात्र तेंव्हा भाजपची उघड नाराजी दिसून आली नाही. मात्र नुकत्याच पार पडलेल्या पालकमंत्र्यांच्या पहिल्याच दोन दिवसीय दौऱ्यात जिल्हा भाजपने गैरहजेरी लावून नाराजी व्यक्त केल्याचे चित्र उमटले.

वाई- महाबळेश्वर- खंडाळा या तीन तालुक्यांचा समावेश असलेला पालकमंत्र्यांचा मतदारसंघ राज्यातील बहुधा सर्वाधिक मोठा मतदारसंघ आहे . माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘दरे’ हे गाव याच मतदारसंघात मोडते. आबा या नावाने परिचित मकरंद पाटील यांची राजकीय कारकीर्द सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, सलग चारवेळा आमदार, जिल्हा बँकेचे संचालक आणि वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष असा चढता राहिला आहे. त्यांना प्रथमच पालकमंत्री पदाची संधी मिळाली.

प्रशासकिय आणि संघटनात्मक झाडाझडती

या पार्श्वभूमीवर २५ आणि २६ जानेवारी रोजी त्यांचा बुलढाण्याचा पहिला दौरा पार पडला . हा दौरा तसा चाचपणी करणारा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सिंदखेडराजा मधील जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन त्यांनी मतदारसंघाचा धांडोळा घेतला. बुलढाण्यात प्रशासकीय आढावा बैठक घेतली .जिल्हाधिकारी कार्यालयात चार तास चाललेल्या या बैठकित त्यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. योजना, अंमलबजावणीतील त्रुटी, शासन निर्णय याची खडानखडा माहिती असल्याचे दिसून आले . प्रलंबीत जिगाव सिंचन प्रकल्प, लोणार व सिंदखेड राजा विकास आराखडा, मनरेगा वरील कमी खर्च हे मुद्धे चर्चेत घेतल्याने त्यांनी बुलढाण्यावर चांगलीच ‘तयारी केल्याचे दिसून आले.

झेंडावंदनानंतर त्यांनी बुलढाण्यात संघटनात्मक बैठक घेतली . अनुनभवी आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांचे मोजके सहकारी आणि बुलढाणेकर ज्येष्ठ नेते टी डी अंभोरे पाटील यावर अजितदादा गटाचा डोलारा उभा असल्याचे आबांच्या लगेच लक्षात आले. बुलढाण्यात लावण्यात आलेले स्वागत फलक पण आमदार कायंदे यांनी लावलेले होते, हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही .त्यामुळे त्यांनी संघटना विस्तार साठी आपण पूर्ण वेळ देणार , तालुकानिहाय दौरे करणार असे त्यांनी जाहीर केले.

दौऱ्याला गैरहजेरीचे गालबोट

या पार्श्वभूमीवर बव्हंशी यशस्वी ठरलेल्या या दौऱ्याला मात्र मित्र पक्ष आणि जिल्ह्यात युतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपचा अघोषित बहिष्कार हा राजकीय गालबोट लावणारा ठरला.दौऱ्याच्या प्रारंभ पासून समारोपा पर्यंत भाजपने पालकमंत्र्यांच्या पहिल्या भेटीपासून कटाक्षाने ‘सुरक्षित अंतर’ पाळले! सिंदखेडराजा मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे ते अनेक नेते राहतात . मात्र बहुतेकांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करण्याचे टाळले. पालकमंत्री देऊळगाव राजा येथून बुलढाण्याकडे निघाले असता मार्गावर चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले अन्य कार्यक्रमात व्यस्त राहिल्या. पक्षातर्फ देखील स्वागत करण्यात आले नाही.

बुलढाण्यातील शासकीय आढावा बैठकीला आमदार संजय गायकवाड (शिंदे गट), सिद्धार्थ खरात (ठाकरे गट), मनोज कायंदे (अजितदादा गट) हे हजर राहिले . पालकमंत्र्यांनी समारोपात शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचे दर्शन घेतले. नजीकच्या जळगावचे आमदार संजय कुटे यांची गैरहजेरी खटकणारी ठरली. काँगेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनीही पालकमंत्र्यांचे स्वागत केले. या स्थितीत नजीकच्या मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती , भाजपचे घाटाखालील जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख (जळगाव जामोद) यांनी पालकमंत्र्यांची टाळलेली भेट चर्चेचा विषय ठरली. एकूणच भाजपच्या नेत्यांपासून ते पदाधिकारी यांनी पालकमंत्र्यापासून राखलेले अंतर, टाळलेले स्वागत चर्चेचा विषय ठरला. खामगाव चे आमदार व कामगार मंत्री हे अकोला जिल्ह्यात झेंडावंदन निमित्त आणि नंतर भंडारा येथील स्फोटाची पाहणी करायला गेले होते. मात्र इतर भाजप पदाधिकारी व नेत्यांचे काय? असा सवाल आणि दोन मित्र पक्षातील विसंवाद पालक मंत्र्यांचा पहिल्या दौऱ्यातनिमित्त ऐरणीवर आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp boycotts visit of buldhana guardian minister and rehabilitation minister makarand patil scm 61 mrj