शिक्षक मतदार संघ निवडणूक आचारसंहितेमुळे उद्घाटन, भूमीपूजनाच्या कामाला खीळ

नागपूर महाालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्रीमंडळातील इतरही सदस्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू आहे. असे असतानाच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भाजपची अडचण झाली आहे.

निवडणूक आयोगाने बुधवारी नागपूरसह राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांची घोषणा केली. नागपूर विभागात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. त्यासाठी ३ फेब्रुवारीला मतदान होणार असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ती ९ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. सर्वानी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.

विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री, मंत्र्यांना शासकीय कामाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन करता येणार नाही, तसेच बैठकाही बोलविता येणार नाही, असे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्र्यांनी याला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. याच कारणामुळे नागपूर जिल्हा परिषदेचा पंतप्रधान आवास योजनेचा तर भंडाऱ्यात जिल्हा नियोजन समितीच्या सभेचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र मंत्र्यांना दौरे करता येणार आहेत. आचारसंहितेबाबत आयोगाने काही मुद्दय़ांवर स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. फक्त इतर सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत ही आचारसंहिता शिथिल असेल, असे अनुपकुमार यांनी सांगितले.

पालिका निवडणुकीच्या प्रचार उत्साहावर पाणी

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने शहरात हजारो कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटनाचा सपाटा सुरू केला आहे. नागपूरसह पूर्वविदर्भातील सहा जिल्ह्य़ात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाने अप्रत्यक्षरित्या प्रचारालाच सुरुवात केली आहे. पुढच्या काही दिवसातही अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे.

आचारसंहितेच्या काळात मुख्यमंत्री, मंत्र्यांना मतदारसंघात (नागपूर विभागातील सहा जिल्हे) दौरे करता येतील, पण उद्घाटन, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. त्याचप्रमाणे कोणतीही शासकीय बैठक बोलविता येणार नाही किंवा त्यात सहभागी होता येणार नाही.

अनुपकुमार, निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय आयुक्त, नागपूर.