अमरावती : येथील विलास नगर-मोरबाग प्रभागात विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या प्रभागातील भाजपच्या एका अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उघड भूमिका घेत, युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केल्याने भाजपसमोरील डोकेदुखी वाढली आहे. नवनीत राणा यांनी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन भाजपच्या या उमेदवाराने केले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सुलभा संजय खोडके यांना पाठींबा होता. मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याने मी पक्षादेश मानून सुलभा खोडके यांचा प्रचार केला. तेव्हा मी खोडकेंचे काम करू नये, असा दबाव माझ्यावर होता.

कारण नवनीत राणा यांना खोडकेंना हरवायचे होते. त्याचा सूड घेण्यासाठी नवनीत राणा यांनी माझा जाहीर अपमान केला. पक्ष विरोधी भूमिका जाहीरपणे घेतली. पण, माझा प्रभागातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. ते प्रभागात चारही कमळ चिन्हावरील उमेदवारांना विजयी करतील असा विश्वास असल्याचे भाजपचे उमेदवार राजेश साहू पड्डा यांनी म्हटले आहे. राजेश साहू म्हणाले, काल नवनीत राणा आमच्या प्रभागात भाजपच्या चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. त्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार होत्या तेव्हा मी त्यांच्यासाठी जीवाचे रान केले.

रात्रीचा दिवस करून मी त्यांचा प्रचार केला. माझ्या प्रभागात त्यांना भरघोस मतदान झाले. मी युवावस्थे पासून भाजपचे काम करतो. त्यांचा पराभव झाला तेव्हा त्यांच्या भेटीला गेलो असता माझ्या डोळ्यात अश्रू होते. आमच्या प्रभागात हिंदुत्वाला मानणारे आणि जपणारे मतदार आहेत. त्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या असल्याने मी पण प्रचंड उत्साहित होतो. पण नवनीत राणा यांनी काल उघडपणे माझ्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर फोडण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे माझा समाज देखील नाराज झाला आहे.

मी ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्या समाजावर देखील हे दूषण लावले गेले आहे. त्यांची भूमिका प्रभागातील हिंदुत्ववादी लोकांना अचंबित करणारी आहे. हिंदू पुरस्कर्त्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवनीत राणा या हिंदुत्वात सरळ सरळ फूट पाडत आहेत. माझ्या प्रभागाला आणि माझ्या समाजाला हिंदुत्व म्हणजे म्हणजे कमळ हेच समीकरण पक्के ठाऊक आहे. नवनीत राणा यांच्या या फूट पाडण्याच्या भूमिकेने त्यांनी आमचा अपेक्षा भंग केला आहे.