चंद्रपूर: महापालिका निवडणुक प्रचारात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे १६ हजार पट्टे वाटपाचे आश्वासन मतदारांना देत असताना त्यांच्याच पक्षाचे हकालपट्टी झालेले महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी महापालिका नगर रचना विभागाचे बनावट शिक्के तयार करून प्रभागातील नागरिकांना पट्टे वितरित केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पोलीस अधीक्षक तथा महापालिका आयुक्तांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राहुल भोयर यांनी महापालिका निवडणूक कार्यालयात बोगस पट्टेवाटपाची तक्रार दाखल केली. या तक्रारीत बनावट शिक्के तयार करून पट्टे वितरित केले जात आहे. यामध्ये भाजप उमेदवार आणि माजी भाजप शहराध्यक्ष सुभाष कसंगोट्टवार हे प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांना घरपट्टे वाटप करत आहेत, हा आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोप केला आहे. दरम्यान “निवडणुकीच्या तोंडावर सरकारी यंत्रणेचे बनावट शिक्के वापरून गरिबांची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींना जेलमध्ये पाठवा,” अशी आक्रमक भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे.

भाजप उमेदवार सुभाष कासनगोटूवार यांनी बनावट शिक्के असलेले ‘बोगस पट्टे’ वाटल्याचे महापालिकेच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कासनगोटूवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच खासदार धानोरकर यांनी स्वतः पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व चंद्रपूर पालिका आयुक्त यांची भेट घेऊन भाजपचे अधिकृत उमेदवार सुभाष कसनगोट्टूवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, प्रशांत भारती यांची उपस्थिती होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पालिका अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन तपासणी केली असता, संबंधित सर्व शिक्के आणि कागदपत्रे प्रशासकीय स्तरावर अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या उपायुक्तांनी (जावक क्र. ३५९, दि. १२/०१/२०२६) रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या पत्रात हे शिक्के बनावट असल्याचे मान्य केले आहे. हा प्रकार शासकीय कामकाजाच्या विश्वासार्हतेला बाधा पोहचवणारा असल्याचे म्हटले आहे. पालिकेच्या नगर रचना विभागामार्फत असे कोणतेही शिक्के तयार करण्यात आले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले असून प्रशासनाने देखील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सध्या शहरात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू असताना, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी सरकारी मोहोर आणि पदाचा गैरवापर करून बोगस पट्टे वाटणे हे आचारसंहितेचे थेट उल्लंघन आहे. हा प्रकार भारतीय न्याय संहितेअंतर्गत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून, यामध्ये फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासकीय यंत्रणेची बदनामी करणे असे गंभीर गुन्हे घडलेले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर प्रसारित झालेले फोटो आणि व्हिडिओ हे या गुन्ह्याचे सबळ पुरावे असून, राजकीय फायद्यासाठी जनतेची फसवणूक करणाऱ्या या प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक असल्याचे खासदार धानोरकर यांनी नमूद केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सुभाष कासनगोटूवार आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व आरोपींविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंग आणि फसवणुकीचा त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. सामान्य जनतेची फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. या प्रकरणी महानगरपालिकेने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सहायक नगर रचनाकार प्रतिक देवतळे यांची नियुक्ती केली असून, पोलीस प्रशासनाकडे तक्रार देखील वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी सुभाष कासनगोट्टूवार यांनी माध्यमांशी बोलतांना नागरिकांनी महापालिकेत घरपट्ट्यांसाठी केलेल्या अर्जाची पोचपावती असल्याचे म्हटले आहे.