‎गडचिरोली: उसने घेतलेल्या पैशांच्या परतफेडीवेळी ट्रॅक्टर विक्रीचा बनाव रचून तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून चामोर्शी येथील भाजपचे नगरसेवक आशिष पिपरे , त्यांच्या पत्नी नगरसेविका सोनाली पिपरे , वडील अरुण पिपरे यांच्यावर २७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, अगरबत्ती प्रकल्पामध्ये देखील फसवणूक केल्याचा पिपरे दाम्पत्यावर आरोप आहे. कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.

‎‎पोलिसांच्या माहितीनुसार, वंदना रवींद्र कोठारे (३७, रा. चामोर्शी) यांनी फिर्याद दिली.त्यानुसार, आशिष पिपरे हे त्यांचे नातेवाईक असून त्यांनी २०२१ च्या नगरपंचायत निवडणुकीवेळी कोठारे कुटुंबाकडून ३ लाख रुपये उसने घेतले होते. या पैशांच्या परतफेडीसाठी तगादा लावला असता, आशिष पिपरे यांनी स्वतःचा ट्रॅक्टर (एमएच ३३ व्ही ८०७५) ७ लाख ५० हजार रुपयांत विकण्याचा प्रस्ताव दिला. जुने ३ लाख वजा करून उर्वरित ४ लाख ५० हजार रुपये कोठारे यांनी रोख व आरटीजीएस स्वरूपात दिले. मात्र, पैसे घेऊनही आशिषने ट्रॅक्टरची मूळ कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली.

‎​२० मार्च २०२३ रोजी फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी कोठारे यांच्या घरी पोहोचले तेव्हा या मोठ्या फसवणुकीचा उलगडा झाला. संबंधित ट्रॅक्टरवर ४ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज थकीत असून तो आशिष यांचे वडील अरुण पिपरे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. आरोपीने हा ट्रॅक्टर पत्नीच्या नावावर असल्याचे खोटे भासवून कोठारे कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता. हक्काचे पैसे परत मागितले असता, आरोपीने कोठारे दाम्पत्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप वंदना कोठारे यांनी ठेवला आहे.

‎​आशिष पिपरे यांच्यावर केवळ हा एकच गुन्हा नसून, चामोर्शी येथील सुमारे ४० गरीब शेतकरी व शेतमजूर महिलांची लाखों रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे. २०२० मध्ये अगरबत्ती उद्योगासाठी ‘पंतप्रधान स्वयंरोजगार योजने’अंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून बँकेशी संगनमत केले. प्रत्येकी १.९० लाखांचे कर्ज मंजूर करून मोठा हिस्सा स्वतःच्या खात्यात वळवला आणि महिलांना केवळ १० हजार रुपये दिले. १ लाखाच्या मशीनऐवी २५ हजारांच्या निकृष्ट मशीन देऊन महिलांना देशोधडीला लावले, असा आरोप करत महिलांनी पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

​दोन वर्षांपासून राजकीय दबाव

‎​गेल्या दोन वर्षांपासून तक्रारी देऊनही राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होत नव्हता असा आरोप करत महिलांनी उपोषण सुरू केले होते. २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या आंदोलनात महिलांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. यानंतर ट्रॅक्टरच्या व्यवहारात फसवणुकीचा आरोप करत पोलिसांनी नगरसेवक आशिष व सोनाली पिपरे दाम्पत्यादह त्यांचे वडील अरुण पिपरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ४०६, ४२०, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. तपास हवालदार रामदास कोडापे करत आहेत. याबाबत नगरसेवक आशिष पिपरे यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले होते. फौजदारी कारवाईनंतर त्यांना त्यांना
‎ संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.