यवतमाळ : उमरखेड येथील नगरपालिकेच्या अब्दुल गफूर शाह उर्दू शाळा क्रमांक २ मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान देशविरोधी गीतावर विद्यार्थ्यांकडून नृत्य करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील दोषी शिक्षक आणि संबंधित पदाधिकाऱ्यांवर तातडीने देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. भाजप जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर यांनी आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या शाळेत २६ जानेवारीच्या निमित्ताने शनिवार, ३१ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘ए मर्द-ए-मुजाहिद तेरी यलगार कहाँ है’ या गीतावर विद्यार्थ्यांकडून नृत्य करून घेण्यात आले. हे गीत १९६५ च्या भारत-पाक युद्धादरम्यान पाकिस्तानने आपल्या सैनिकांना आणि नागरिकांना भारताविरुद्ध भडकवण्यासाठी वापरले होते, असा आरोप भाजपने केला आहे. हे गीत आजही पाकिस्तानात लष्करी आणि राष्ट्रीय समारंभात गायले जाते.

भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे आणि चिथावणीखोर शब्द असलेल्या या गीतावर भारतात बंदी असल्याचेही काळेश्वरकर यांनी सांगितले. निरागस विद्यार्थ्यांच्या मनावर देशविरोधी विचार रुजविण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न शाळेकडून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शासकीय शाळेत अशा प्रकारचे धार्मिक आणि प्रक्षोभक गीत वाजवणे हे संविधानाच्या अनुच्छेद २८ चे उल्लंघन आहे. या गीताद्वारे तलवार उचलण्याची भाषा करून लोकांना उग्र आंदोलनासाठी प्रेरित केले जात असल्याचा आरोप काळेश्वरकर यांनी केला.

या प्रकरणी भाजप नगरसेवक गोपाल कलाने यांनी सोमवारी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, कार्यक्रमावेळी नगरपालिकेचे पदाधिकारी, नगराध्यक्ष आणि शिक्षण सभापती उपस्थित होते. हे गीत वाजत असताना त्यांनी ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, याचा अर्थ त्यांचा या कृत्याला अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असा आरोप भाजपने केला आहे.

शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात देशविरोधी गीतावर नृत्याचा हा प्रकार करण्यामागे मोठी विचारधारा काम करत आहे. शासकीय शाळेत जर असे शिक्षण दिले जात असेल, तर त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी महेश काळेश्वरकर यांनी केली. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही भाजपने केली आहे.

पत्रकार परिषदेला भाजप गटनेते विजय हरडपकर, शहराध्यक्ष अतुल खंदारे, नगरसेवक अमोल तीवरंगकर, गोपाल कलाने, पवन मेंढे, बबलू मैड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.