विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे भोयर एकाकी 

चंद्रशेखर बोबडे

नागपूर : निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मतांचे गणित जुळत नसल्याने सुरुवातीला एक पाऊल मागे घेण्याच्या भूमिकेत असलेल्या कॉंग्रेसने ऐनवेळी भाजपचा नगरसेवक फोडून त्याला उमेदवारी देत निवडणुकीत रंगत आणली खरी. पण ती टिकवून ठेवण्यासाठी लागणारी एकजूट आणि ‘रसद’ उभी न केल्याने उमेदवार एकाकी पडला. दुसरीकडे भाजप सर्वशक्तीने मैदानात उतरल्याने व त्यांच्याकडे असलेले मतांचे बळ लक्षात घेता सध्यातरी भाजप ही जागा कायम ठेवण्यात यशस्वी होईल असे चित्र आहे.

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसकडून डॉ. रवींद्र भोयर तर अपक्ष मंगेश देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. पण लढत भाजपचे बावनकुळे व कॉंग्रेसचे भोयर अशीच आहे.

एकूण ५६० मतदार आहेत. यापैकी ३३४ मतदार भाजपकडे आहेत.  कॉंग्रेसचे संख्याबळ १४४ आहे.. निवडणूक जिंकण्यासाठी २८० पहिल्या पसंतीच्या मतांची गरज आहे. आज तरी भाजपकडे यापेक्षा पन्नासहून अधिक मते अधिक आहेत. भाजपची मते फुटली तरच निवडणुकीत चमत्कार अपेक्षित आहे. त्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे करिश्मा असावा लागतो किवा भक्कम आर्थिक पाठबळ तरी असावे लागते. यापैकी काहीच कॉंग्रेस उमेदवार भोयर यांच्याकडे नसल्याने सध्यातरी ही निवडणूक एकतर्फी म्हणजे भाजपच्या बाजूने झुकलेली दिसते.

२०१५ मध्ये कॉंग्रेसने ऐनवेळी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली होती व ही जागा भाजपकडे गेली होती. सहा वर्षांनंतर राजकीय  स्थितीत बदल झाला नसल्याने कॉंग्रेस ही निवडणूक लढवण्याबबात उत्सुक नव्हती. कारण कोणी लढण्यासही तयार नव्हते. भाजपचे रवींद्र भोयर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पक्षाला उमेदवार मिळाल्याने कॉंग्रेसनेही त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. भोयर भाजपची मते फोडतील व निवडणुकीत रंगत येईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात भोयर यांच्या पाठीशी काँग्रेस भक्कमपणे उभीच राहिली नाही. त्यामुळे ते एकटे पडले. दुसरीकडे भोयर यांना मतफोडण्याची संधीच मिळू नये म्हणून भाजपने त्यांच्या गटातील मतदार शहराबाहेर पाठवून कोंडी केली. त्यामुळे भोयर अस्वस्थ झाले. यातून त्यांच्या उमेदवारी माघारीची अफवा पसरली. त्यांचे साधे खंडनही काँग्रेसकडून झाले नाही. अखेर भोयर यांनाच ही जबाबदारी पार पडावी लागली यावरून त्याचा पक्षातील एकाकीपणा दिसून आला.

कॉंग्रेसकडून पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली. पण ते सक्रिय झाल्याचे दिसून आले नाही. भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विधानसभभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठका घेतल्या. निवडणुकीला दोन दिवस शिल्लक असले तरी आहे ते चित्र बदलण्याची शक्यता नाही, त्यामुळे भाजप ही जागा कायम ठेवेल असे वाटते.

भाजपच्या पायाखालील वाळू सरकू लागल्याने ते अफवा पसरवू लागले आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा र्पांठबा मिळत आहे. पक्षाच्या नगरसेवकांवर विश्वास नसल्याने त्यांना सहलीला पाठवले आहे. पण त्यापैकी अनेक माझ्या बाजूने आहेत.

डॉ. रवींद्र भोयर, काँग्रेस उमेदवार

पालकमंत्री असताना जिल्ह्यात केलेली विकास कामे सर्वांपुढे आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे. भाजपचे एकही मत फुटणार नाही, त्यामुळे विजय निश्चित आहे.

चंद्रशेखर बावनकुळे,  भाजप उमेदवार