अमरावती : आंतरराष्‍ट्रीय बाजारात कापूस आणि सोयाबीनचे दर कोसळल्‍यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, त्‍यांना तत्‍काळ नुकसानभरपाई म्‍हणून अनुदान द्यावे, अशी मागणी आम्‍ही राज्‍य सरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांमध्‍ये निर्माण झालेला रोष देखील निवडणुकीतील पराभवासाठी कारणीभूत असल्‍याचा सूर आढावा बैठकीत कार्यकर्त्‍यांकडून व्‍यक्‍त झाला, त्‍याची दखल आम्‍ही घेतली असल्‍याचे भाजपचे नेते आशीष देशमुख यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या पराभवानंतर कारणमीमांसा करण्‍यासाठी गुरुवारी भाजपच्‍या कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी भाजपच्‍या स्‍थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांमध्‍ये कुठल्‍याही प्रकारचे मतभेद नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. आशीष देशमुख म्‍हणाले, नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला सुरुवातीला विरोध झाला, हे खरे असले, तरी राजी-नाराजी विसरून सर्व नेते, कार्यकर्त्‍यांनी नवनीत राणा यांच्‍या विजयासाठी परिश्रम घेतले. पण, त्‍यांचा निसटता पराभव झाला. पराभवासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत, यावर चिंतन केले जात आहे. सोयाबीन, कापूस उत्‍पादकांमध्‍ये रोष आहे, नोकरभरती बंद असल्‍यामुळे युवक, युवती अस्‍वस्‍थ आहेत, अशा भावना कार्यकर्त्‍यांनी व्‍यक्‍त केल्‍या. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्‍टरी अनुदान तत्‍काळ मिळावे, अशी मागणी आम्‍ही शिंदे सरकारकडे केली आहे.

हेही वाचा…“काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार”, भागवत कराड यांचा आरोप; म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था…”

मध्‍यप्रदेशमध्‍ये राबविण्‍यात येत असलेली ‘लाडली बहना’ ही योजना महाराष्‍ट्रातही लागू करावी, रखडलेली पदभरती पुन्‍हा सुरू करावी, या मागण्‍या राज्‍य सरकारकडे करण्‍यात येणार आहेत, असेही आशीष देशमुख म्‍हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी संत गजानन महाराजांच्‍या पालखी दरम्‍यान शेतकऱ्याकडून पाय धुवून घेतले. स्‍वत:ची पाद्यपूजा करवून घेतली. हा संत गजानन महाराजांच्‍या सर्व भक्‍तांचा, शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्‍यांनी या सर्वांची माफी मागितली पाहिजे. पक्षश्रेष्‍ठींसमोर वारंवार दयायाचना करणारे नाना पटोले हे गजानन महाराजांच्‍या भक्‍तांची, शेतकऱ्यांची माफी मागणार नाहीत, अशी टीका आशीष देशमुख यांनी केली.

हेही वाचा…‘हिट अँड रन’ मध्ये जखमी ‘त्या’ चिमुकलीचाही मृत्यू

महाविकास आघाडीने जाती-धर्मात द्वेष निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍याचा वापर निवडणुकीत केला. आम्‍ही त्‍यांच्‍याकडून पसरविण्‍यात आलेले गैरसमज खोडून काढण्‍यात कमी पडलो, त्‍यामुळे अनेक जागांवर आमचा पराभव झाला. झालेल्‍या चुका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत आम्‍ही सक्षमपणे त्‍यांचा मुकाबला करू आणि निवडून येऊ, असा दावा आशीष देशमुख यांनी केला. पत्रकार परिषदेला खासदार डॉ. अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.