चंद्रपूर : भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता इतकी तीव्र झाली आहे की, प्रदेश नेतृत्वही त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाढत्या वादामुळे पक्षात निर्माण झालेल्या तणावासमोर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हतबल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, चंद्रपूरमधील महत्त्वाचे निर्णय आता थेट दिल्ली स्तरावर घेतले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महापालिका निवडणुकीपासूनच मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. उमेदवारांची यादी जाहीर करताना १७ नावांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे मुनगंटीवार नाराज झाले होते. ही सर्व नावे त्यांच्या गटाशी संबंधित होती. तरीदेखील त्यांनी महापौरपदावर आपल्या गटातील संगीता खांडेकर यांची निवड करून आपले वर्चस्व दाखवून दिले.

दुसरीकडे, जोरगेवार गटाचे नगरसेवक संख्येने अधिक असूनही त्यांना गटनेता पदाव्यतिरिक्त कोणतीही महत्त्वाची जबाबदारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीला अधिक धार आली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव, तसेच झोन क्र. ३ मध्ये उमेदवारी मागे घ्यावी लागल्याने पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला.

या पार्श्वभूमीवर जोरगेवार यांनी आपल्या समर्थक १७ नगरसेवकांसह नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. मात्र, या बैठकीत चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत कबुली दिली की हा वाद आता त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. चंद्रपूरमध्ये निरीक्षक म्हणून जाण्यास कोणीही नेता तयार नसल्याने, येथील सर्व प्रश्न दिल्लीकडे पाठवून तिथेच अंतिम निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शहर निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले माजी राज्यमंत्री मदन येरावार यांनीही या वादामुळे पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे. पक्षातील वरिष्ठतेमुळे आणि मुनगंटीवार यांच्या प्रभावामुळे इतर नेतेही या संघर्षात हस्तक्षेप करण्यास टाळाटाळ करत आहेत. एकूणच, चंद्रपूर भाजपमधील गटबाजी आता शिगेला पोहोचली असून स्थानिक नेतृत्वाऐवजी केंद्रीय नेतृत्वालाच हस्तक्षेप करावा लागत आहे, हे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.