चंद्रपूर : राजुरा येथील तरूण वकील, नोटरी आणि भारतीय जनता पक्षाचे राजुरा शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन कमलाकर वासाडे (४२) यांनी आज रविवार ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान १२ दिवसातील वकिलाची ही दुसरी आत्महत्या असल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
बिनधास्त व्यक्तीमत्व असलेल्या ॲड. नितीन वासाडे यांच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे. नितीन यांनी १५ दिवसांपूर्वीच आपल्या घराचे नूतनीकरण करून कार्यक्रम केला होता. नेमकी कोणत्या कारणांनी नितीन यांनी आत्महत्या केली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. राजुरा शहरातील एवढ्यातील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही दहावी घटना आहे तर शहरातील १२ दिवसातील ही दुस-या वकिलाची आत्महत्या आहे. यापूर्वी दिनांक २४ फेब्रुवारी रोजी ॲड. अमित जयपूरकर यांनी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
नितीन वासाडे हे विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे. त्यांची मुलगी शिकवणीला गेली होती, तिला आणायला त्यांची पत्नी घराबाहेर गेली होती. तेव्हा घरी कुणी नसतांना वेळ साधून आपल्या घरी गळफास घेऊन नितीन वासाडे यांनी आत्महत्या केली. पत्नी व मुलगी घरी येताच हा प्रकार उघडकीस आला. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचेमागे वडील श्री शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त अधिक्षक कमलाकर वासाडे, आई, पत्नी व मुलगी आहे. राजुरा पोलिस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा सुरू आहे. या तरूण वकिलाच्या मृत्यूबद्दल येथे हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्याचे सत्र सुरू
मागील काही दिवसांत राजुरा शहरात आत्महत्या वाढल्या आहेत. ११ फेब्रुवारी रोजी फिरोजशहा लेआउट येथील रहिवासी तरुण अभियंता दीपक बाबा पाडे (३४) याने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दीपक पाडे हे पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच ते पुण्यावरून राजुराला आले होते. या तरुणाची आत्महत्या धक्कादायक होती. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील शेतकरी कमलाकर राजेश्वर भेंडे (६५) याने आत्महत्या केली. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सततच्या नापिकीमुळे नैराश्यातून आत्महत्या केली होती. घरी फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी ॲड. अमित जयपूरकर या वकीलाने आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या या घटनेनंतर आज रविवार ८ मार्च रोजी ॲड. वासाडे याने आत्महत्या केली. राजुरा शहरातील आत्महत्यांचे हे सत्र कधी थांबणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच आत्महत्यांच्या या सत्रांमुळे चिंताही व्यक्त केली जात आहे.
