चंद्रपूर: वाळू घाटातील ९८ लाख रुपये परत देण्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी होवून भारतीय जनता पक्षाचे पुलगाव शहर महामंत्री भरत दयानंद नागपाल (४२) याची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना वरोरा तालुक्यातील वणा नदीच्या पात्रात घडली.

या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रफुल्ल उमाटे, सुनिल झोरे व अतुल मोटघरे या तीन आरोपींना अटक केली आहे तर सात जण फरार आहेत. हत्येची घटना रविवारी घडली असून तक्रार सोमवारी सकाळी सहा वाजता देण्यात आली आहे. दरम्यान राजकीय आशिर्वादाने वाळू घाटांवर गुंडांच्या टोळ्यांचा हैदोस सुरू असून हा संघर्ष आता एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत पोहचला आहे.

वरोरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वरोरा तालुक्यातील बामर्डा येथील वणा नदीचा वाळू घाट भद्रावती येथील गितेश सातपुते यांना २०२५ मध्ये मिळाला होता. त्यानंतर वानखेडे यांच्यासह दिनेश नागपाल (रा. पुलगाव), कैलास धारवाल (रा. वर्धा), भरत नागपाल (रा. वर्धा), भूषण वाघमारे (रा. सेलू), मयूर गौळकार (रा. वरोरा), योगेश रामटेके (रा. वरोरा), राजू गोवारदिपे (रा. वरोरा), हर्षल बोधाणे (रा. वरोरा), प्रविण घुरडे (रा. हिंगणघाट), अमोल ठोंबरे (रा. हिंगणघाट) आणि अमित साहू (रा. हिंगणघाट) यांनी एकत्र येऊन दोन कोटी पाच लाख रुपयांत हा वाळू घाट सातपुते यांच्याकडून विकत घेतला होता. वाळू घाटाचे संपूर्ण पैसे सातपुते यांच्या बँक खात्यात जमा केले होते. या वाळू घाटाचा कालावधी ९ जून २०२६ पर्यंत होता.

मात्र २५ जानेवारी २०२६ रोजी सातपुते यांनी घाट परत मागितला. त्यामुळे वाळू घाटाचे उर्वरित ९८ लाख ६४ हजार ६२१ रुपये २८ फेब्रुवारीपर्यंत परत देण्याचे आश्वासन सातपुते यांनी वानखेडे यांना दिले होते. मात्र रक्कम परत मिळाली नाही. दरम्यान १ मार्च रोजी कैलास धारवाल यांनी गितेश सातपुते यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पैसे देण्याबाबत सातपुते यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ही बाब धारवाल यांनी पंकज वानखेडे यांना सांगितली. त्यानंतर वानखेडेंनी यासंदर्भात सातपुते यांच्याशी बोलणी केली तेव्हा त्यांनाही अशाच प्रकारे उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे संतापलेल्या वानखेडे यांनी सहकाऱ्यांसह वाळू घाटावर धडक दिली.तेव्हा घाटावर वाळू उपसा सुरू होता. दरम्यान, सातपुते यांनी मयूर गौाकार यांच्याशी संपर्क साधून तुम्ही घाटावर आहात का, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या कामगारांनी पोकलॅंडच्या साहाय्याने घाटातून बाहेर जाणारे दोन्ही रस्ते बंद केले.

काही वेळातच चारचाकी वाहनातून अमोल रामचंद्र कामडी, अक्षय खडसे व इतर तीन जण तेथे पोहोचले. त्यांच्या हातात तलवारी व लाकडी दांडे होते. सौरभ ठाकूर हा हातात तलवार घेऊन आला. त्याच्यासोबत सुनील झोरे, प्रफुल्ल उमाटे आणि अतुल मोटघरे होते. दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली. सौरभ ठाकूर यांनी भरत नागपाल यांच्या डोक्यावर तलवारीने वार केला. तो खाली कोसळला. त्यानंतर वानखेडे आणि त्यांच्या साथीदारांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या शेतात पळ काढला. मात्र भरत नागपाल बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्याला पुन्हा मारहाण करून नदीपात्रात फेकण्यात आले. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी वाहनांची तोडफोड केली. गाड्या जाळण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पोलिस येत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पळ काढला. पोलिसांनी भरत नागपाल यांना पाण्याबाहेर काढून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी गितेश सातपुते (रा. भद्रावती), अमोल कामडी (रा. वर्धा), अक्षय खडसे (रा. वर्धा), सौरभ ठाकूर (रा. वर्धा), सुनील झोरे (रा. सावंगी मेघे), प्रफुल्ल उमाटे (रा. वर्धा), सातपुते यांचा दिवाणजी आणि दोन पोकलॅंड ऑपरेटर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान मृतकाची आई पुलगाव नगर पालिकेची नगरसेविका आहे तर मृतक स्वत: भारतीय जनता पक्षाचे पुलगाव शहर महामंंत्री आहेत. सर्वांना वर्धा जिल्ह्यातील एका आमदाराचा आशिर्वाद होता असेही सांगण्यात येत आहे.या आशिर्वादातूनच वाळूची तस्करी सुरू होती अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.