गडचिरोली : नक्षलमुक्तीच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या शेजारील छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात वाळू व्यवसायातील वर्चस्व आणि आर्थिक व्यवहारांतील वादातून भाजपचे स्थानिक नेते भारत सिंह ऊर्फ लाला सिंह यांच्यासह तिघांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा नोगई गावाजवळ घडलेल्या या घटनेत हल्लेखोरांनी भारत सिंह यांच्या फॉर्च्युनर वाहनाचा पाठलाग करून ते ट्रकांच्या सहाय्याने अडविले आणि वाहनाला आग लावल्याचा आरोप आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली असून वाळू व्यवसायातील वाढत्या गुन्हेगारीचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.

सोहनत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोगई गावाजवळ ही घटना घडली. भारत सिंह हे जनपद पंचायतचे माजी अध्यक्ष तसेच भाजपचे स्थानिक नेते होते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित परिसरातील वाळू उत्खननाचे कंत्राट भारत सिंह यांच्या कुटुंबाकडे होते. दुसरीकडे, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा व्यवसाय त्रिपाठी कुटुंबाकडे असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक व्यवहार आणि व्यवसायावरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता.

मंगळवारी रात्री भारत सिंह हे आपल्या सहकाऱ्यांसह फॉर्च्युनर वाहनाने प्रवास करत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर वाहनाच्या पुढे आणि मागे ट्रक उभे करून त्यांचा मार्ग रोखण्यात आला. वाहनाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न राहिल्याने हल्लेखोरांनी त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा आरोप आहे.

हल्लेखोरांकडून मारहाण

या आगीत भारत सिंह यांचा वाहनातच होरपळून मृत्यू झाला. वाहनातील इतरांनी जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्लेखोरांनी मारहाण केल्याचे तपासातून समोर आले आहे. या घटनेत शिक्षक नागेंद्र सिंह आणि वीरेंद्र सिंह यांचाही मृत्यू झाला. वीरेंद्र सिंह यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे सांगितले जात असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

परिसरात तणावाचे वातावरण

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिहेरी हत्याकांडानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून वाळू व्यवसायाशी संबंधित गुन्हेगारी कारवायांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.