scorecardresearch

भंडारा बलात्कार प्रकरण : अत्याचार करणारा चौथा आरोपी कोण?

अत्यवस्थ अवस्थेतही पीडितेने पोलीस व डॉक्टरांनाही चार आरोपी असल्याचे संकेत दिले.

भंडारा बलात्कार प्रकरण : अत्याचार करणारा चौथा आरोपी कोण?
प्रतिनिधिक छायाचित्र

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात चार आरोपींनी अत्याचार केल्याचे संकेत पीडितेने दिले आहेत. पोलिसांकडून मात्र तिघांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यामुळे या प्रकरणातील चौथा आरोपी कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शनिवारी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडितेची भेट घेतली.

अत्यवस्थ अवस्थेतही पीडितेने पोलीस व डॉक्टरांनाही चार आरोपी असल्याचे संकेत दिले. त्यापैकी दोन आरोपींना अटकही झाली. परंतु हा चौथा आरोपी कोण, हा प्रश्न कायम आहे. हे प्रकरण प्रथम हाताळणारे भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश थोरात म्हणाले, पोलिसांनी पीडितेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तिची स्थिती नाजूक होती. तिला बोलताही येत नव्हते. यावेळी तिने दिलेल्या प्राथमिक माहितीवरून तिघांवर गुन्हा दाखल करत त्यापैकी दोन आरोपींना अटक केली. पीडितेची स्थिती सुधारल्यावर आणखी माहिती कळू शकेल. हा गुन्हा पुढील तपासासाठी गोंदिया पोलिसांकडे वर्ग केला आहे.

गुंतागुंत का वाढली?

पीडिता कन्हाळमोह जंगलातून जात असलेल्या एका दुचाकीचालकाला २ ऑगस्टच्या सकाळी दिसली. त्यानंतर पोलिसांनी तिला प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. येथे केवळ मलमपट्टी झाली. पीडितेची गंभीर प्रकृती बघत तिला थेट नागपुरातील मेडिकल रुग्णालयात हलवणे अपेक्षित होते. परंतु त्यापूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयात नेले गेले. येथून नागपुरातील मेडिकलला पोहोचायला संध्याकाळचे ५.३० वाजले. यादरम्यान अधिक रक्तस्त्रावाने पीडितेचा रक्तदाब ६० पर्यंत खाली घसरला. त्यामुळे गुंतागुंत वाढली.

पोलिसांनी २४ तास या प्रकरणात गुन्हाच दाखल केला नाही. या घटनेमध्ये तीन नव्हे तर चार आरोपी होते. मात्र पोलिसांनी आतापर्यंत तीनच आरोपी असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे चौथा आरोपी नेमका कोण, हे तिच्याकडूनच स्पष्ट होईल.

चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप.

राजकीय पर्यटनामुळे संसर्गाचा धोका

पीडितेवर मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूतीरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातच सध्या करोना व स्वाईन फ्लूचेही रुग्ण वाढले आहे. त्यामुळे या आजाराची बाधा पीडितेला होऊ नये म्हणून तिच्या वॉर्डात कुणालाही प्रवेश नाकारला जाणे गरजेचे आहे. परंतु, विविध राजकीय पक्षांचे नेते तिथे गर्दी करीत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; महिला आयपीएस अधिकाऱ्यामार्फत चौकशी

नागपूर : या घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader chitra wagh meet bhandara rape victim zws

ताज्या बातम्या