अमरावती: भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता येऊ नये, यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्न करताना दिसतात. भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे आज अमरावती शहरात आले. त्यांनी पश्चिम विदर्भातील भाजपच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कानमंत्र दिला. शक्ती केंद्र आणि बूथ वरील कार्यकर्ते सक्रिय ठेवण्यासाठी अध्यक्ष, सरचिटणीस तसेच जिल्हा प्रभारी या चमूने चर्चा करून दर महिन्याचा कृती आराखडा तयार करावा, दौऱ्यांची, प्रवासाची योजना आखावी त्यामुळे संघटना अधिक मजबूत होणार असल्याचे शिवप्रकाश यांनी सांगितले.

पदाधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्या ओळखाव्या

शिवप्रकाश म्हणाले, पक्षसंघटनेत कुठेही शिथिलता न येऊ देता संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखाव्या, पक्ष संघटनेतल्या प्रत्येक स्तरावरच्या कार्यकर्त्याला वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी संवाद करणे व कामांची आखणी करण्याचे आवश्यक आहे. मजबूत सक्षम आणि परिणामकारक संघटनाच विविध प्रश्नांवरील उत्तर ठरणार आहे. ही भाजपची संघटना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आणि व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे सशक्त माध्यम आहे.

योजनांचा प्रचार करण्याचे आवाहन

शिवप्रकाश म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानववादावर आधारित योजना या समाजाच्या शेवटच्या घटकाची काळजी करणाऱ्या त्याला आधार देणाऱ्या योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या योजना अशाच स्वरूपाच्या असल्याने त्याचे लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच एसआयआर या राष्ट्रीय कार्यात योगदान देण्यासाठी शक्ती केंद्र व बूथ स्तरावरचे कार्यकर्ते सतत सक्रिय राहणे आवश्यक असल्याचे शिवप्रकाश म्हणाले.

प्रसिद्धी, प्रचारासाठी प्रवास करा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना, नुकतीच महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांची झालेली वीज बिल माफी, पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्ष २०३१ पर्यंत मिळालेली मुदतवाढ या सर्व बाबी जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ताबडतोब प्रसिद्धी प्रचार प्रवास बैठका या संदर्भात नियोजन करण्याचे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. या बैठकीला आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रवीण पोटे, विदर्भ प्रदेश संयोजक दिनेश सूर्यवंशी, माजी आमदार विजयराव जाधव,  शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, पदाधिकारी जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, विनोद वाघ, भाजपच्या संघटनात्मक दहा जिल्ह्यांचे अध्यक्ष महामंत्री व या जिल्ह्यांचे जिल्हा प्रभारी प्रामुख्याने उपस्थित होते.