अमरावती : विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. धीरज लिंगाडे यांनी त्‍यांचे निकटचे प्रतिस्‍पर्धी भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांचा ३ हजार ३६८ मतांनी पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाद फेरीच्‍या मतमोजणीअखेर धीरज लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मते प्राप्‍त झाली, तर डॉ. रणजित पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली. विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा ४७ हजार १०१ इतका निश्चित करण्‍यात आला होता. धीरज लिंगाडे हे कोटा पूर्ण करू शकले नाहीत, पण सर्वाधिक मते प्राप्‍त करून ते विजयी ठरले आहेत.

हेही वाचा… नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दुसऱ्यांदा उच्च न्यायालयाची नोटीस

मतमोजणीच्‍या तीस तासांच्‍या कालावधीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्‍या. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते प्राप्‍त झाली होती. लिंगाडे यांची आघाडी ही त्‍यावेळी २ हजार ३१३ मतांची होती. वैध मतांची संख्‍या ही ९३ हजार ८५२ इतकी असल्‍याने विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा हा ४६ हजार ९२७ मते इतका निश्चित करण्यात आला होता. मात्र डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधीने अवैध ठरलेल्‍या ८ हजार ७३५ मतांचे फेरअवलोकन करण्‍याची मागणी केली. ही मागणी मान्‍य करण्‍यात आली. त्‍यानुसार रात्री उशिरा या मतपत्रिकांची पडताळणी सुरू करण्‍यात आली. त्‍यानंतर लिंगाडे यांची आघाडी ही २ हजार ३४६ मतांवर पोहचली. यातही डॉ. पाटील यांचे नुकसानच झाले, पण मतांचा कोटा हा ४७ हजार १०१ मतांवर पोहचला होता.

हेही वाचा… Maharashtra Latest Breaking News Today : अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी; भाजपाचा पराभव

मतमोजणीची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडे पाठविण्‍यात आली असून विजयाची औपचारिक घोषणा व्‍हायची आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp lose amravati graduate constituency maha vikas aghadis dhiraj lingade win the seat mma 73 asj
First published on: 03-02-2023 at 14:49 IST