जमावबंदी झुगारून भाजपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शहरात कायदा व सूव्यस्था  कायम ठेवण्यासाठी सोमवारपासून पोलिसांनी जमावबंदी लागू के ली असताना भाजपने ती झुगारून केशरी रेशनकार्डधारकांना धान्य द्यावे.

गरिबाना धान्य द्या, भूखंड नियमितीकरण शुल्क कमी करा

नागपूर : शहरात कायदा व सूव्यस्था  कायम ठेवण्यासाठी सोमवारपासून पोलिसांनी जमावबंदी लागू के ली असताना भाजपने ती झुगारून केशरी रेशनकार्डधारकांना धान्य द्यावे व  भूखंडाच्या नियमितीकरणाची शुल्कवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी हजारो लोकांचा मोर्चा काढला. एक प्रकारे ही नियमांची पायमल्ली होती, अशी टीका आता भाजपवर होत आहे. दरम्यान मोर्चा पूर्वनियोजित होता असे भाजपकडून सांगण्यात आले तर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

अमरावती हिंसाचार आणि गडचिरोली जिल्ह्य़ात  झालेल्या नक्षल चकमकीनंतर सुरक्षा म्हणून पोलीस आयुक्तांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे. पाच जणांपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास १४४(१) नुसार कारवाई केली जाते. मात्र, या आदेशाला जमावबंदीला झगारून हा मोर्चा काढण्यात आला. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियमजवळ एकत्र आले. तेथून मोर्चा आशकवाणी चौकात दुपारी एकच्या सुमारास पोहचला. येथे मोर्चा स्वरूप बदलून जाहीर सभेत झाले. माजी मंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शहरातील भाजपचे सर्व आमदार आणि पदाधिकारी सहभागी झालेत.

यावेळी बावनकुळे म्हणाले, करोनाच्या काळात केंद्र सरकारने १९ महिन्यापर्यंत धान्य नि:शुल्क दिले. त्याचा लाभ महाविकास आघाडी सरकाने घेतला आणि दोन लाख ६७ हजार रेशनकार्डधारकांना सरकारी स्वस्त धान्यापासून वंचित केले. ऑनलाईन प्रक्रिया बंद करण्यात आली. रेशनकार्डला आधारकार्ड जोडणे बंद करण्यात आले आहे. हे सर्व गरिबांचे धान्य खुल्या बाजारात विकावयास मिळावे म्हणून करण्यात आले, आरोपही बावनकुळे यांनी केला.

ऑनलाईन प्रक्रिया सुरू करून सर्वाना धान्य पुरवठा करण्यात यावा. तसेच गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमित करण्यासाठी १६८ रुपये प्रतिचौरस फूट शुल्क आकारणे बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली.  यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणाऱ्या निवेदनातील मागण्या वाचून दाखवल्या.

दरम्यान, यशवंत स्टेडियम तेआकाशवाणीपर्यंत सर्व आमदार, पदाधिकारी व वंचित लाभार्थ्यांनी पायी चालत सरकारविरोधी घोषणा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर मोर्चा पुढे सरकला. आंदोलनात महापौर दयाशंकर तिवारीही सहभागी झाले होते.

गृहमंत्र्यांचे कारवाईचे संकेत

उपराजधानीत जमावबंदी लागू करण्यात  आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने येथे शांतता व सुव्यवस्थेसाठी लागू करण्यात आलेल्या कायद्याचे पालन करायला हवे. परंतु भाजपकडून येथे जमाव गोळा करून मोर्चा काढणे योग्य नाही. याप्रकरणी संबंधित विभागाकडून नियमानुसार कारवाई केली जाईल, असे  संके त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना  दिले.

मोर्चा नियोजित – बावनकुळे

 हा मोर्चा पूर्वनियोजित होता. १५ दिवसांपूर्वीच याबाबतची नोटीस दिली होती. मोर्चा दडपण्यासाठी ही जमाबंदी लागू करण्यात आली, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकु ळे यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp march collectors office ysh

Next Story
प्रशासनाची कुंभकर्णी झोप कधी संपणार?