चंद्रपूर : भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी रात्री आजी-माजी नगरसेवक व शेकडो समर्थकांसह गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. भाजप महानगर अध्यक्षपदी सुभाष कासनगोट्टूवार यांची नियुक्ती केल्याबद्दल फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यासाठी गडचिरोली गाठले, असे जोरगेवार सांगत असले तरी त्यांनाही मंत्रिपदाची लालसा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जिल्हा भाजपमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आमदार जोरगेवार, असा संघर्ष सुरू आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करताना दोन्ही गटांना न्याय दिला. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मुनगंटीवार समर्थक हरीश शर्मा यांची नियुक्ती केली, तर महानगर अध्यक्षपदी जोरगेवार समर्थक कासनगोट्टूवार यांची नियुक्ती केली. कोसनगोट्टूवार यांच्या निवडीत मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळेच नागपुरात आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री यांची भेट घेवून आभार मानायचे, असे जोरगेवार यांनी ठरविले होते. मात्र, मुख्यमंत्री शुक्रवारी गडचिरोलीत आले. त्यामुळे जोरगेवार यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गडचिरोलीत जाऊन फडणवीस यांची भेट घेतली.

मुनगंटीवार ज्येष्ठ असतानाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही. यामुळे जोरगेवार यांच्या मनात मंत्रिपदाची लालसा जागी झाली आहे. जोरगेवार यांचे गडचिरोलीतील शक्तिप्रदर्शन त्याच व्युहरचनेचा एक भाग असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट वाटपात आपली महत्त्वाची भूमिका राहील, असा संदेशदेखील त्यांनी या माध्यमातून दिल्याचे बोलले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महानगर जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासनगोट्टूवार यांची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी येथे आलो. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी माता महाकालीचे दर्शन घ्यावे, याचे निमंत्रणही त्यांना द्यायचे होते, असे जोरगेवार यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस माजी मुख्यमंत्री मा.सा कन्नमवार यांच्या शतकोत्तर जयंती समारंभासाठी तसेच सन्मित्र बँकेच्या कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माता महाकालीचे दर्शन घेतले होते. आमदार जोरगेवार यांना याचा विसर पडलेला दिसतो.