चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करतांना मोबाईल वापरावर सक्त मनाई आहे. पर्यटकांना जिप्सीत एका बॉक्स्मध्ये मोबाईल ठेवावा लागतो. मात्र वरोरा-भद्रावती विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार करण देवतळे यांनी उघडपणे नियमभंग करतांना सफारी करतांना जिप्सीतूनच मोबाईलव्दारे रील तयार करून समाज माध्यमावर सार्वत्रिक केली आहे. दरम्यान वन विभाग आता आमदारावर कारवाई करणार का असा प्रश्न वन्यजीव प्रेमी तथा पर्यटकांकडून केला जात आहे. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून आमदारावर कारवाई करावी अशी मागणी समोर आली आहे.
जागतिक पातळीवर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची दखल घेतली गेली आहे. ताडोबातील वाघ व बिबट बघण्यासाठी देशविदेशातील पर्यटक ताडोबात जंगल सफारीकरिता येतात. उन्हाळ्याला सुरूवात होताच देशविदेशातील पर्यटकांची ताडोबात गर्दी झालेली आहे. मात्र ताडोबात पर्यटकांसोबतच लोकप्रतिनिधी आणि सर्वांसाठी नियम सारखेच आहेत. पर्यटक वाघाचा पिच्छा करित असल्याच्या असंख्य घटना समोर आल्याने
वन्यजीवांचे संरक्षण आणि जंगलातील शिस्त राखण्यासाठी ताडोबा प्रशासनाने अनेक कडक नियम लागू केले आहेत. त्यामध्ये सफारीदरम्यान मोबाईल फोन वापरणे किंवा जवळ बाळगणे यावर सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यटकांवर पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
अशा परिस्थितीत वरोरा-भद्रावती मतदार संघाचे भाजप आमदार करण देवतळे यांनी ताडोबा प्रशासनाचा नियम मोडल्याची घटना समोर आली आहे. आमदार देवतळे यांनी नुकतीच ताडोबा बफर झोनमधील निमढेला गेटवरून सपत्नीक जंगल सफारी केली. या सफारीदरम्यान त्यां व्हिडिओ तयार करून त्याची ‘रिल’ समाज माध्यमावर सार्वत्रिक. मात्र या रिलमध्ये जिप्सीच्या आरशात मोबाईल स्पष्टपणे दिसून येत असल्याने सफारीदरम्यान मोबाईल वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जिप्सीत चालक आणि गाईड आहेत. तेव्हा गाईड आणि चालकांनी आमदार देवतळे यांना वन विभागाच्या नियमांची आठवण करून द्यायला हवी होती. मात्र त्यांनीही आमदारांना नियम, कायदे याची आठवण करून दिली नाही असेच दिसत आहे.
त्यामुळेच आमदार देवतळे यांनी पत्नीसह मोबाईलमध्ये रील तयार केली आहे. आता ही रील समाज माध्यमावर सार्वत्रिक झाल्यानंतर आमदार देवतळे यांच्यावर वन्यजीव अभ्यासक, पर्यावरण प्रेमी तथा जंगलात सामाजिक काम करणाऱ्यांकडून टिका होत आहे. तसेच वन विभाग आता लोकप्रतिनिधीवर कारवाई करणार का असाही प्रश्न उपस्थित करित आहे.
