चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या मनातील भूताची भिती दूर करण्यासाठी भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांनी थेट समशान भूमी लगत दीड कोटी रूपयांच्या भव्य वाचनालयाचे भूमिपूजन केले आहे.

एकीकडे स्मशात भूमित सरण जळत असेल तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके असणार अशी चर्चा आता गावात सुरू झाली आहे. स्मशानभूमित लोक अंतिम संस्कारासाठी जातात मात्र आता स्मशानभूमी लगत विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीसाठी जावे लागणार असेही बोलले जात आहे.

राजुरा विधानसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या धाबा गावात खनिज विकास निधीतून दीड कोटी रूपयाचे वाचनालाय इमारतीचे भूमिपूजन आमदार देवराव भोंगळे यांचे हस्ते झाले. गावात वाचनालय हवे अशी चर्चज्ञ मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. आमदार भोंगळे यांनी वाचनालय दिल्याने सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे. मात्र खरी चर्चा वाचनालयासाठी निवडलेल्या जागेची होत आहे. ज्या जागेवर वाचनालय उभे होणार आहे, त्या जागेला लागूनच स्मशान भूमी आहे. गावातील मोठा नाला तिथूनच वाहतो. परिसरात झाडेझुडपे आहेत. अधून मधून वन्यजीव याच मार्गाने गावात शिरतात.

ज्या मार्गाने वाचनालयात जावं लागतं, त्या मार्गांवर मोठ्या संख्येने ताडवृक्ष आहेत. परवाना प्राप्त ताडीचे दुकान सुद्धा तिथेच आहे. अशा परिसरात वाचनालय उभे करण्याचे कारण काय ? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी कार्यक्रम अंतर्गत वाचनालयासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला.जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चंद्रपूरने भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. वाजत गाजत आमदार भोंगळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

मात्र, जागेला घेऊन विरोधकांनी टीका केली. आता विद्यार्थी सुद्धा बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवत आहेत. गावात दोन वाचनालय आहेत. एक वाचनालय श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान येथे आहे. या वाचनालयात बऱ्यापैकी पुस्तके आहेत. मात्र पुस्तके वाचायला वाचक नाही अशी स्थिती आहे. बेघर परिसरात वाचनालयाची नवी कोरी इमारत उभी आहे. मात्र या वाचनालयात एकही पुस्तक नाही. आता तिसऱ्या वाचनालयाची निर्मिती होत आहे आणि तेही समशानभूमी परिसरात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किमान येथे तरी वाचक मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी आमदार देवराव भोंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, एकवीसव्या शतकात भूतबाधा किंवा अंधश्रध्देचे विषय नको. जागेची निवड ही ग्रामपंचायत करित असते. ग्रामपंचायतींनेच ही जागा निवडली आहे. मात्र, ही जागा आपण बदलणार आहे. त्याला कारण गावापासून ही जागा दूर आहे. तेंव्हा लवकरच जागेच बदल करू असेही भोंगळे म्हणाले.