नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्वच भाजप नेत्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तोंडसुख घेतले. आता हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘एक्स’वर दिलगिरी व्यक्त करून विषयाला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. टिपू सुलतानवरून हर्षवर्धन सपकाळांवर टिकेचे झोड उठविणाऱ्या भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या ९४२०१५४४६९ या मोबाईल क्रमांकाच्या स्टेट्सवर चक्क मंगोल सम्राट चंगीझ खानच्या फोटोसह सुविचारही असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

भाजपचे विधानपरिषद आमदार परिणय फुके यांच्या व्हॉट्स स्टेट्सवर चंगेज खानच्या फोटोसह इंग्रजीमध्ये ‘इफ यू आर अफ्रेड, डोंट डू इट, इफ यू आर डूगिंग इट, डोंट बी अफ्रेड’ असा सुविचार आहे. एकीकडे टिपू सुलतान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात तुलना केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टिका केली होती. ‘टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे अतिशय निंदनीय आहे. त्यांना लाज वाटायला पाहिजे’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडसुख घेतले होते. त्यानंतर भाजपच्या सर्वच नेत्यांनी सपकाळ व कॉंग्रेसचा खरपूस समाचार घेतला. सपकाळ यांनीही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या तुलनेवरून राज्यात भाजप-कॉंग्रेस कार्यकर्तेही समारोसमोर आले.

अनेक ठिकाणी भाजपने कॉंग्रेसविरोधात तसेच सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन केले. कॉंग्रेसनेही भाजपच्या आंदोलनाला आंदोलनाने उत्तर दिले. मागील आठवड्यातील शेवटचे दिवस याच वादात गेले. अखेर सपकाळांनी मंगळवारी ‘एक्स’वर दिलगिरी व्यक्त केली. परंतु आता भाजप आमदार परिणय फुके यांच्या स्टेट्सवरील मंगोल सम्राट चंगीझ खानाच्या फोटोने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत ९४२०१५४४६९ क्रमांकावर संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कोण होता चंगेज खान

चंगीझ खान हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. इ. स. ११८३ च्या सुमारास तेमुजीनच्या मंगोल सैन्याने त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास दर्शवून त्याला ‘चंगीझ’ असे संबोधण्यास सुरुवात केली. इ.स. १२०६ पासून चंगीझने आपल्या नावामागे ‘खान’ लावायला सुरुवात केल्याचे इतिहासकारांनी म्हटले आहे.