लोकसत्ता टीम
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ‘ॲक्शन मोड’वर आली आहे. भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली असून पक्षाच्या नऊ विभागाची संघटनात्मक आढावा बैठक शहरात आज एका खासगी हॉटेलमध्ये घेण्यात येणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यात भाजपने आघाडी घेतली. निवडणुकीपूर्वी संघटनात्मक आढावा घेतला जात आहे. पुणे येथे भाजप नेते व गृहमंत्री अमित शाह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयानुसार अकोला शहर, अकोला ग्रामीण, अमरावती शहर व ग्रामीण, यवतमाळ शहर व पुसद विभाग, तसेच वाशीम जिल्हा, बुलढाणा व खामगाव अशा नऊ संघटनात्मक पश्चिम विदर्भातील विभागाच्या कोर कमिटीची बैठक शनिवारी होणार आहे. यामध्ये आगामी विधानसभा, संघटनात्मक स्थिती, विधानसभानिहाय चित्र, नकारात्मक आणि सकारात्मक मुद्दे, चेतना जागृती आदींचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश उपाध्यक्ष आ. संजय कुटे, भाजप प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अनुप धोत्रे, खा. अनिल बोंडे आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
आणखी वाचा- वर्धा : चार दशकाची पायपीट एकदाची थांबली! पावसाळ्यात वाहून जाण्याची…
वेगवेगळ्या विभागांची बैठक होणार असून यात आगामी कार्यक्रम व रूपरेषा, सरकारच्या योजना संदर्भात आराखडा तयार करण्यात येणार आहे. नऊ विभागातील आमदार तसेच कोर कमिटीचे सदस्य बैठकीत उपस्थित राहतील. पश्चिम विदर्भातील ४५० पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहतील. या बैठकीच्या तयारीसाठी खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात ७८ कार्यकर्त्यांची चमू तयारीला लागली आहे.
आणखी वाचा-कारण राजकारण: गृहमंत्री फडणवीस यांची घरच्या मैदानातच कसोटी
अकोल्यात आता चार दिवसाआड पाणी पुरवठा
धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने आता अकोला शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन अकोला महापालिकेने केले आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये महान धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. महान धरणात २६ जुलै रोजी ३२.९६१ द.ल.घ.मी. म्हणजे ३८.१७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला. धरणातील होणाऱ्या पाणी साठ्यातील वाढ लक्षात घेता अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारे शहरात आता पाणी पुरवठ्यात एक दिवसाने कपात करण्यात आली. आता २९ जुलैपासून संपूर्ण शहराला चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. शहरातील नगरिकांनी याची नोंद घेऊन पिण्याचे पाणी काट कसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.