नागपूर : भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुरुवारी काढलेल्या लोकशाही वाचवा पदयात्रेमुळे संपूर्ण शहरात वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला. या पदयात्रेसाठी संपूर्ण विदर्भातून ५ हजारांपेक्षा अधिक गाड्यांमध्ये ३० ते ३५ हजार कार्यकर्ते नागपुरात आल्याने वर्धा मार्गापासून शहरात येणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहतूक कोंडीचा नागपूरकरांना सामना करावा लागला. छत्रपती चौकापासून ते मानकापूर चौकापर्यंत पदयात्रेच्या स्थळी यशवंत स्टेडीयकडे येणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहतूक कोंडी झाली.
या मार्गावर वाहतूक खोळंबली….
भाजपाच्या पदयात्रेमुळे विशेषतः जनता चौकापासून ते पदयात्रेच्या मार्गावरील संविधानचौकापर्यंत संपूर्ण वाहतूक खोळंबली. मानकापूरच्या दिशेने कस्तुरचंद पार्क उड्डाणपूल, कामठी कडून एलआयसी चौकात उतरणारा उड्डाणपूल, झिरोमाईल चौकातून अजनी चौकाकडे जाणारा आदिवासी गोवारी उड्डाणपूलावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
पदयात्रेसाठी तब्बल ५ हजार वाहने…..
पदयात्रेसाठी संपूर्ण विदर्भातून पाच हजारहून अधिक चारचाकी वाहनांमधून ३० ते ३५ हजार कार्यकर्ते नागपुरात आले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एन सणासुदीच्या काळात वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे.
दिवाळी खरेदीला फटका….
धंतोली आणि सीताबर्डीचा भार हा बाजाराचा परिसर आहे. त्यात दीपावली निमित्त आधीच खरेदीसाठी बाजारात गर्दी असताना पदयात्रेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांमुळे खरेदीला फटका बसला. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागपूरकरांना पोलिसांनी सीताबर्डी आणि धंतोलीकडे जाणारे अनेक मार्ग अडवून धरल्याने नागपूरकरांना दूरपर्यंत फेरा घेऊन मनस्ताप सोसावा लागला. त्याचा मुले आणि ज्येष्ठांना त्रास झाला. खरेदीसाठी आलेल्या अनेकांनी या मोर्चावर नाराजी व्यक्त केली.
रुग्णवाहिकांचे हाल…
धंतोली आणि रामदासपेठ सारख्या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांचे जाळे आहे. या भागात आधीच वाहतूकीची सायंकाळच्या वेळी कोंडी होत असताना त्यात पदयात्रेमुळे रुग्णवाहिकांनाही त्रास सोसावा लागला.
वाहतूक शाखेचे दावे फोल
संविधान वाचवा पदयात्रेसाठी ७००वर पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेसह कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र तो फोल ठरला. दिवाळीचा सण, त्यात बाजारपेठांमध्ये गर्दी आणि पदयात्रेसाठी आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांमुळे सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
