नागपूर : कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते अभिजित दिपके व आशुतोष रांका आंदोलनादरम्यान अटकेमुळे चांगलेच चर्चेत आले. जंतरमंतर येथील एका आंदोलनादरम्यान तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आता आशुतोष रांका यांना पाकिस्तानातून पैसे मिळाल्याचा व अभिजित दिपकेंना विदेशातून मदत होत असल्याचा सनसनाटी आरोप भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी केला.
‘आशुतोष रांका यांना ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकच्या महिलेकडून निधी’
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, विदेशात राहणारे भारतीय नागरिक भारतात करमुक्त व्याज मिळवण्यासाठी एफसीआर खाती उघडतात. अनेक संस्था या एफसीआरच्या लाभार्थी आहे. सीजेपीचे अभिजित दीपके यांनाही विदेशी मदत होत आहे. त्याचवेळी ऑपरेशन सिंदूरविरोधात जनमत तयार करण्यासाठी दीपके यांचे सहकारी आशुतोष रांका यांना पाकिस्तानच्या सानिया निसारकडून पैसे मिळाले, असा आरोप प्रेम शुक्ला यांनी केला. देशात अराजकता परसरविण्यासाठी नेहा बोरा, ध्रुव राठी काम करीत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
रामलिला मैदानावरील राहुललिला ‘फ्लॉप’
यावेळी शुक्ला यांनी रविवारी रामलिला मैदानावरील कॉंग्रेस नेते राहुललिला फ्लॉप ठरल्याचा दावाही केला. १ लाख लोकांचा दावा केला होता. परंतु २० ते २५ हजार नागरिक यात सहभागी होते. त्यातही एसआयआरद्वारे नावे वगळण्यात आलेले कुणीही नव्हते. केवळ कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते, असे ते म्हणाले. लोकशाही बचावच्या नावावर राहुल गांधी व इंडिया आघाडी अराजकता पसरविण्याचे काम करीत आहे. देशात आतापर्यंत १२ वेळा एसआयआर प्रक्रिया झाली असून यातील दहावेळी कॉंग्रेसच्या कार्यकाळात झाली. परंतु लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आवश्यक असल्याची जाणीव असल्याने प्रमुख विरोधी पक्ष असूनही भाजपने आक्षेप घेतला नाही, असेही ते म्हणाले.
१३ कोटी मतदार वगळल्याचा राहुल गांधींचा दावा फोल
राहुल गांधी यांनी १३ कोटी मतदार वगळल्याचा दावा फोल असल्याचे आकडेवारीसह शुक्ला यांनी सांगितले. ६.३० कोटी मतदारांची नावे दोन ठिकाणी होती. ३ कोटी नागरिक सर्वेक्षणादरम्यान अनुस्थित होते. २.८० कोटी लोक मृत झाले होते. १ कोटी लोकांची नावे दोन ठिकाणी होती. त्यामुळे त्यांची नावे वगळण्यात आल्याचे शुक्ला यांनी सांगितले. २०१४ पासून आतापर्यंत कॉंग्रेसला लोकसभेत ४४, ५४ आणि मागील निवडणुकीत ९९ जागा जिंकता आल्या. याशिवाय राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात कॉंग्रेसच्या आमदारांच्या संख्येत २००४ मध्ये ११८२ वरून आतापर्यंत ६६३ आमदार, अशी मोठी घट झाली तर भाजप आमदारांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. सलग पराभव व अपयशाने निराश झालेले राहुल गांधी आता अराजकता पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
