नागपूर : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत परस्परांना शह देण्यासाठी भाजपची मदत घेतली. भंडाऱ्यात भाजपला खिंडार पाडत काँग्रेसने अध्यक्षपद पटकावले तर गोंदियात भाजपने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीशी युती करून अध्यक्षपद पटकावले.

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी भाजप बंडखोर संदीप टाले यांची निवड झाली तर गोंदिया जि.प. अध्यक्षपदी भाजपचे प्रशांत रहांगडाले यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे यशवंत गणवीर यांची निवड झाली. भंडारा हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा तर गोंदिया हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा  जिल्हा आहे. पटोले यांनी भंडाऱ्यात भाजपला खिंडार पाडून धक्का दिला तर गोंदियात पटेल यांनी भाजपच्या मदतीने पटोले यांना शह दिला. मंगळवारी दोन्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली.

राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना शह देण्यासाठी पटोले यांनी भाजपमध्ये नाराज असलेले माजी आमदार चरण वाघमारे यांची मदत घेतली. त्यांच्या गटाचे ५ आणि १ अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक २१ सदस्यीय असलेल्या काँग्रेसला पाठिंबा दिला. सहा सदस्यीय फुटीर गटाला सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकला.

गोंदियात पटोलेंना धक्का

गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. पण ओबीसी आरक्षणाच्या तिढय़ामुळे ती लांबली होती. ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपकडे २६, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ व अपक्ष ६ सदस्य आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी व अपक्ष अशी युती होऊन भाजपला शह दिला जाईल, असा अंदाज होता. पण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व नाना पटोले यांच्यातील राजकीय वाद लक्षात घेता भाजपने डाव साधून राष्ट्रवादीच्या मदतीने अध्यक्षपद पटकावले. याला अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या गटाच्या ४ अपक्षांनी पाठिबा होता.

भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता. भाजपच्या बंडखोरांनी पाठिंबा दिल्याने येथे पक्षाची सत्ता आली. आम्ही कुठेही आघाडीचा धर्म मोडला नाही. याउलट भंडारा पं.स. तसेच गोंदिया जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादीची युती झाली ही वास्तविकता आहे. 

– अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस.