scorecardresearch

बंजारा समाजाला सनातन धर्माशी जोडण्याचे भाजप, संघाचे षडयंत्र; देवानंद पवार यांचा गंभीर आरोप

बंजारा समाजाला सनातन धर्माशी जोडण्याचे भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे षडयंत्र असल्याचा घणाघाती आरोप बंजारा समाजाचे नेते तथा प्रदेश काँग्रेसचे संघटन सचिव देवानंद पवार यांनी केला.

बंजारा समाजाला सनातन धर्माशी जोडण्याचे भाजप, संघाचे षडयंत्र; देवानंद पवार यांचा गंभीर आरोप
देवानंद पवार (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पोहरादेवीचे महत्त्व कमी करण्याचा डाव

बुलढाणा : कोणतेही धार्मिक संदर्भ नसलेल्या गोद्री (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे बंजारा समाज कुंभमेळा आयोजित करणे म्हणजे, समाजाची काशी वा शक्तीपीठ असलेल्या पोहरादेवीचे महत्त्व व महात्म्य कमी करण्याचे कुटील कारस्थान आहे. बंजारा समाजात उभी फूट पाडणे व सिंधू संस्कृतीशी नाळ जुळलेल्या बंजारा समाजाला सनातन धर्माशी जोडण्याचे भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे षडयंत्र असल्याचा घणाघाती आरोप बंजारा समाजाचे नेते तथा प्रदेश काँग्रेसचे संघटन सचिव देवानंद पवार यांनी केला.

हेही वाचा >>> VIDEO : गोपीचंद पडळकर यांच्या बंधूवर मिरजेत दुकान तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

गोद्री येथे २५ ते ३० जानेवारीदरम्यान आयोजित बंजारा कुंभमेळाविरुद्ध समाज बांधवात जनजागृती करण्यासाठी आज, शनिवारी येथील संत सेवालाल महाराज मंदिर येथे सहविचार सभा पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी जामनेरचे आमदार गिरीश महाजन आणि भाजप-संघावर घणाघाती आरोप केले. यावेळी समाज नेते संजय राठोड, आत्माराम जाधव, राजपालसिंह राठोड, राजेश राठोड, एकनाथ चव्हाण हजर होते. पोहरादेवी हे जगातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान व शक्तीपीठ आहे. मात्र, या पवित्र स्थानाला डावलून कोणतेही धार्मिक संदर्भ नसलेल्या गोद्री येथे कुंभमेळा घेण्याचा अट्टाहास का?, असा संतप्त सवाल पवार आणि संजय राठोड यांनी केला. पोहरादेवी येथे आयोजन न करण्यामागे या शक्तीपीठाचे महत्त्व कमी करणे, समाजात फूट पाडणे, हाच उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> फार्महाऊसमध्ये कोंडून तीन वर्षे बलात्कार; पीडित मुलगी ११ दिवसांच्या बाळासह ताब्यात

जामनेर मतदारसंघातील हजारो बंजारा मतदारांवर डोळा ठेवून व आ. गिरीश महाजन यांच्या राजकीय सोयीसाठी हे कारस्थान असल्याचे पवार म्हणाले. काही मूठभर नेते व कथित धर्मगुरू यांना हाताशी धरून हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्याला राज्यासह देशातील समाज बांधवांचा विरोध  आहे. मात्र, तरीही अट्टाहास करून मेळा आयोजित करण्यामागे भाजप व संघाचे षडयंत्र आहे. त्यासाठी साशनाकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले. ही तरतूद म्हणजे सामाजिक भ्रष्टाचार असून ‘ईडी’ खरोखर निष्पक्ष असेल तर त्यांनी याचा तपास करावा, अशी मागणी आत्माराव जाधव यांनी यावेळी केली.

हेही वाचा >>> २०३६ मध्ये ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारत तयार!, अध्यक्ष पी.टी. उषा यांचा दावा

बंजारा समाज कुंभमेळा पोहरादेवी वगळून अन्यत्र का?

बंजारा संस्कृतीची नाळ १६ हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीशी जुळलेली आहे. अलीकडच्या काळातील व मानवतावादी नसलेल्या सनातन धर्माशी बंजारा समाजाला जोडणे हा हास्यास्पद प्रकार आहे. हिंदू धर्माचा कुंभमेळा हा ठराविक ठिकाणीच आयोजित करण्यात येतो. मग बंजारा समाज कुंभमेळा पोहरादेवी वगळून अन्यत्र का आयोजित केला जात आहे, असा प्रश्न देवानंद पवार यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 20:03 IST

संबंधित बातम्या