महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी जोरात

नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी  भारतीय जनता पक्षाकडून आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक कार्यकर्तेही स्वत:ची उमेदवारी जाहीर करून निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. त्यातील काहींनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क सुरूही केला आहे. अशा स्वयंघोषित उमेदवारांवर पक्षाच्या कोअर कमेटीची  करडी नजर असून त्यातील काहींना ताकीद देण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीला तीन महिन्यांचा वेळ आहे. परंतु, विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता आणि नंतर महापालिकेच्या निवडणुकीसाठी लागणारी आचारसंहिता बघता जनसंपर्कासाठी वेळ कमी मिळणार आहे. तीनचा प्रभाग असल्यामुळे एका प्रभागात ४० ते ४५ हजार मतदार राहण्याची शक्यता आहे. सध्या आचारसंहितेमुळे कुठलेही कार्यक्रम करणे शक्य नाही. त्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी आणि विविध कार्यक्रमासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्यामुळे अनेक स्वयंघोषित इच्छुकांनी आपापल्या प्रभागात जनसंपर्क सुरू केला आहे. काही विद्यमान सदस्य  साडेचार वर्षांत केलेल्या विकास कामांचा अहवाल तयार करून प्रभागातील लोकांपर्यंत पोहचवत आहेत.

पक्षाकडून कुठल्याही  विद्यमान व इच्छुकांच्या नावाची  घोषणा करण्यात आली नसली तरी अनेक इच्छुकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळू शकते, असे दावे सुरू केले आहेत. मध्य, दक्षिण पश्चिम, पूर्व आणि मध्य नागपुरात अशा इच्छुक उमेदवारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विधानसभानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत अनेक विद्यमान सदस्यांच्या नावाला विरोध होत असून नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली जात आहे. 

शहर अध्यक्षांना अधिकार नाहीत

उमेदवारी मिळेल असे आश्वासन कुणालाही दिलेले नाही आणि पक्षात तशी पद्धतही नाही. या संदर्भात  शहर अध्यक्षांना कुठलेही अधिकार नाहीत. आजी-माजी नगरसेवक व इच्छुकांचे प्रगती पुस्तक बघून पक्षाची कोअर कमिटी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील.

प्रवीण दटके, शहर अध्यक्ष, भाजप.