नागपूर : नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून भाजपने मुंबई महापालिकेत अजित पवार गटाशी युती करण्यास विरोध केला असे तेथील नेते सांगत असले तरी मुंबईत राष्ट्रवादीशी युती करायचीच नाही, हे पूर्वीच ठरले आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे आहे त्यांचा प्रश्न आहे, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लोकसत्ता’च्या जनसंवाद कार्यक्रमात मांडली. मलिक यांच्यावर आरोप आहेत, ते अद्याप सिद्ध झाले नाहीत, असा निर्वाळाही बावनकुळे दिला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गट यांची युती होणार असली तरी अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निवडणुकीत उतरली आहे. मलिक यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध असल्याचा आरोप आहे, त्यामुळे भाजप राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमित साटम आणि सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री आशीष शेलार सांगत आहेत. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत, पण ते सिद्ध झाले नाहीत. मुंबईत राष्ट्रवादीशी युती करायची नाही हे पूर्वीच दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत ठरले आहे.
दोन शून्यांची बेरीज शून्यच
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे त्याचा परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीवर काय होणार? असा प्रश्न बावनकुळे यांना विचारला असता ते म्हणाले, दोन शून्यांची बेरीज शून्यच होणार. त्याचा काहीही परिणाम निवडणुकीवर होणार नाही. ते दोघे म्हणजे मराठी किंवा मुंबई नाही, असे बावनकुळे म्हणाले.
जिंकण्यासाठी अन्य पक्षांतील लोकांना घ्यावेच लागेल
निवडणुका जिंकण्यासाठी केवळ विचारधारा पुरेशी नसून संघटनात्मक ताकद वाढवणे तितकेच महत्त्वाचे आहे. जिथे भाजप स्वतःच्या बळावर ५१ टक्के मतांचा टप्पा गाठू शकत नाही, तिथे अन्य पक्षांतील प्रभावी व क्षमतेची माणसे पक्षात घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ज्या ठिकाणी एखाद्या पक्षाच्या झेंड्याच्या मागे लोकांची रांग लागते, तिथेच खरी ताकद असते. त्यामुळे पक्ष वाढवायचा असेल तर माणसे जोडावी लागतात असे त्यांनी नमूद केले.
