अकोला : भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये काही जण जखमी देखील झाले आहेत. या वादाचे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. राजकीय वादातून झालेल्या मारहाणीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

नेमका वाद काय?

अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड नगर पालिकेच्या सभेत चित्रीकरण करण्याच्या कारणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला. सभेदरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान नगर पालिकेसमोर हाणामारीत झाले. या घटनेत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक ऋषिकेश पंचबुद्धे यांच्यासह दोन्ही गटांतील काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे बांधकाम सभापती अजित खान जमीर खान यांनाही मारहाण झाल्याचा दावा केला आहे. सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती आहे. या प्रकरणामुळे हिवरखेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नगराध्यक्षाचे भाचे जखमी

नगराध्यक्ष दुतोंडे यांचे भाचे विशाल कुलट यांच्या हाताला दुखापत झाली असून डोक्याला व पोटाला धारदार शस्त्राने मारहाण झाल्याची माहिती माजी सरपंच संदीप इंगळे यांनी दिली. परवानगी न घेता ऋषिकेश पंचबुद्धे यांनी जाणीवपूर्वक चित्रीकरण सुरू केले. मनाई केल्यानंतरही त्यांनी चित्रीकरण सुरूच ठेवल्याने वाद झाला. काही वेळाने सभा पूर्ववत सुरू झाली, अशी माहिती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुलभा दुतोंडे यांनी दिली.

विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप

नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता असून दादागिरीच्या माध्यमातून जनतेचा आणि विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सभेत प्रश्न विचारल्यामुळे नगरसेवक ऋषिकेश पंचबुद्धे यांना मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले असून मलाही मार लागला, असे शिवसेना शिंदे गटाचे गटनेते रवी राणा घुंगड यांनी सांगितले.

स्पष्ट बहुमतात भाजप सत्तेत

हिवरखेड नगर पालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे भाजप बहुमतात सत्तेत आहे. एकूण २० जागा असलेल्या हिवरखेड नगर पालिकेमध्ये भाजपचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गट पाच, काँग्रेस दोन, वंचित बहुजन आघाडी व एआयएमआयएम प्रत्येकी एक नगरसेवक आहेत. हिवरखेड नगर पालिका निवडणुकीत राजकीय वाद उफाळून आला असून तो पेटण्याची चिन्हे आहेत.