अकोला : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्यावतीने पश्चिम विदर्भात ३० मार्च ते ६ एप्रिल याकाळात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या भागातील ३२ मतदारसंघांतून ही यात्रा प्रवास करणार आहे. सावरकर गौरव यात्रेद्वारे नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> श्रीराम जन्मोत्सव ‘हायजॅक’ ; कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह
पश्चिम विदर्भात यात्रेची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आमदार डॉ.संजय कुटे यांना देण्यात आली आहे. आठ दिवस ३२ मतदारसंघात यात्रेचे मार्गक्रमण झाल्यावर भाजपच्या स्थापना दिनी ६ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भातील यात्रेचा समारोप होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती आमदार सावरकर यांनी दिली. ‘‘महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान निमूटपणे सहन केला. सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती,’’ असे सावरकर म्हणाले.