नागपूर: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत सुमारे १५ हजार मतपत्रिका अवैध ठरल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. यापैकी सुमारे चार हजार मतपत्रिकांवर भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर दोन क्रमांक नोंदवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एकाच उमेदवाराच्या नावासमोर दोन पसंतीक्रम नोंदवले गेल्याने या मतपत्रिका अवैध ठरल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारामुळे मतदारांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा चुका झाल्या कशा, असा प्रश्न उपस्थित होत असून, भाजपमधील उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
सोलेंची बंडखोरी आणि…
भाजपने कोहळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले होते. माजी आमदार अनिल सोले यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपसमोर बंडखोरीचे आव्हान निर्माण झाले होते. तसेच कोहळे यांच्या उमेदवारीवर भाजप परिवारातील काही घटक नाराज असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा मतदानावर काही परिणाम झाला का, याबाबत तर्क लावले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर अवैध ठरलेल्या मतपत्रिकांपैकी सुमारे चार हजार मतपत्रिकांवर कोहळे यांच्या नावासमोर दोन क्रमांक नोंदवण्यात आल्याचा दावा महत्त्वाचा ठरत आहे. मात्र, या मतपत्रिकांवरील नोंदींचे स्वरूप आणि त्या अवैध ठरण्याची नेमकी कारणे, यांची अधिकृत पडताळणी झाल्याशिवाय या प्रकारामागील कारणांविषयी निष्कर्ष काढता येणार नाही.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना उमेदवारांसाठी पसंतीक्रम द्यावा लागतो. त्यामुळे पसंतीक्रम नोंदवताना झालेली चूक मतपत्रिका अवैध ठरण्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र, एकाच उमेदवाराच्या नावासमोर दोन क्रमांक नोंदवण्याचा प्रकार हजारो मतपत्रिकांमध्ये आढळल्याचा दावा खरा असल्यास, त्यामागील कारणांचा शोध घेणे भाजपसाठी आवश्यक ठरणार आहे.
कोहळेंविरोधात कटकारस्थान?
पदवीधर मतदारसंघामध्ये तब्बल ४००० मतपत्रिकांवर दोन क्रमांक लिहिण्यात आल्याने हे एका विशिष्ट गटाने कोहळेंविरोधात रचलेले कटकारस्थान तर नाही ना, अशीही चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. भाजप पहिल्या पसंतींची मते घेण्यावर कायम भर देतो. असे असतानाही भाजपकडून अशाप्रकारची चूक झाल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
