नागपूर: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपली तरी नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांनी अद्याप त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. रविवारी काँग्रेसने महापालिकेसाठी ‘मिशन १००’ ची घोषणा केली तर भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन उमेदवारांबाबत चर्चा केली.

सोमवारी सकाळपासून इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गडकरींच्या घरासमोर गर्दी केली आहे. यावेळी आपल्या प्रभागातून दुसऱ्याच पक्षातून आलेल्या नवीन लोकांना उमेदवारी दिली जात असल्याची चर्चा इच्छुकांमध्ये आहे. यामुळे भाजपचे इच्छुक उमेदवार प्रचंड संतापले असून त्यांनी चक्क महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवला. तसेच बाहेरच्याच लोकांना पक्ष उमेदवारी देत असेल तर अनेक वर्षांपासून पक्षात असणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे काय? असा प्रश्न केला. बावनकुळे साहेब कृपया तुम्ही लक्ष द्या, अशी विनंतीही कार्यकर्त्यांनी केली.

मागील एक आठवड्यापासून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात उमेदवार निश्चित करण्याबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठी याबाबत अंतिम निर्णय घेते. मात्र भाजपचे सर्व निर्णय नागपुरातच होतात. नागपूर महापालिका भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, तर १५ वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने पुन्हा महापालिकेत सत्ताप्राप्तीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोनही पक्षाकडून बंडखोरी टाळण्यासाठी सावध पावले उचलली जात आहे.

रविवारी उमेदवारांवर चर्चा करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक झाली. दुसरीकडे देवडिया भवनात काँग्रेसची बैठक झाली. त्यात ‘मिशन १००’ ची घोषणा करण्यात आली. मात्र, दोनपानी उमेदवारी यादी जाहीर केली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे.

नाराजांना समजवणे पाच मिनीटांचे काम: बावनकुळे

यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नागपूरसह अन्य शहरांमधील युती आणि उमेदवारी यादीचे चित्र आज स्पष्ट होईल असे सांगितले. तसेच नाराजांची संख्या मोठी असली तरी भाजपचा कार्यकर्ता समजदार असून त्यांची अवघ्या पाच मिनीटात आम्ही समजूत काढू शकू असेही ते म्हणाले. सर्वच भागातील युतीबाबत निर्णय झाला असून कुठेही वाद नाही असेही ते म्हणाले.