समाजमाध्यमातून काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपने केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांचा रोख काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर होता. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांसाठी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तीन वषार्ंपूर्वी ज्या समाज माध्यमाच्या जोरावर भाजपने सत्ता मिळवली तेच माध्यम आता भाजपवर उलटले आहे. विशेषत: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची समाज माध्यमांवरील सक्रियता आणि त्यावर त्यांना मिळणारा प्रतिसाद, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, याची पक्षाने दखल घेतली असून काँग्रेसच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. राहुल गांधी यांची समाज माध्यमांवरील अलीकडच्या काळातील सक्रियता व त्यातून भाजप विरुद्ध केला जाणाऱ्या प्रचाराचे पोषण विदेशातून होत आहे. सुरुवातीला पक्षाने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले.

शिष्यवृत्तीसाठी ५० टक्के हजेरी सक्तीची

महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शिष्यवृत्तीसाठी किमान ५० टक्के हजेरी सक्तीची करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिले.

दबाव पूर्वी होता, आता नाही!

मुख्यमंत्री म्हणून काम करताना सुरुवातीच्या काळात दबाव यायचा, अशी कबुली देत फडणवीस यांनी आता मात्र कुठल्याही परिस्थितीवर मात करून सहज निर्णय घेण्याची क्षमता आली आहे, असे सांगितले.