नागपूर : भाजपा महिला आघाडीने शिवसेनेच्या नेत्या व अभिनेत्री दीपाली सैय्यद यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापल्याचा आरोप केलाय. याविरोधात भाजपा महिला आघाडीने नागपूरात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शहरातील सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र होत आंदोलन केलं.

भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांना निवेदन देत दीपाली सैय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी भाजपा महिला आघडीच्या वतीने देशाच्या पंतप्रधान यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाही असा आरोपही केला. यापूर्वीही दीपाली सैय्यद यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वक्तव्य केले. तेव्हाही तक्रार दिल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले.

हेही वाचा : मोहफुलाच्या दारूला विदेशी दारू म्हणणारे सरकार कुणालाही मुख्यमंत्री म्हणू शकेल : सुधीर मुनगंटीवार

हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत असेल, तर मग दीपाली सैय्यद यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही, असा सवाल महिला आघाडीच्या वतीने विचारण्यात आला.