चंद्रपूर : चंद्रपूर शहरात उघडकीस आलेल्या नवजात बाळ विक्री आणि मानवी तस्करी प्रकरणाच्या तपासाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणातील दस्तऐवजीकरण आणि इतर प्रक्रियेत मदत केल्या प्रकरणी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक तथा भारतीय जनता पक्षाशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी दोघींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही महिला भाजपशी संबंधित

रामनगर पोलिसांनी यापूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित अल्पवयीन मुलीची आई तसेच नवजात बालक खरेदी केल्याचा आरोप असलेल्या दोन महिलांना अटक केली होती. या सर्व आरोपींविरुद्ध मानवी तस्करी तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तपासादरम्यान नवजात बालकांच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि इतर प्रक्रियेत दोन महिला पदाधिकाऱ्यांची भूमिका समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री सायली येरणे व भाग्यश्री हांडे या दोघींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईनंतर प्रकरणाचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या दोन्ही महिला स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाशी संबंधित असून, त्यापैकी एक सायली येरणे महिला आघाडीतील महामंत्री या महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहे. या प्रकरणात संबंधित महिलांची नेमकी भूमिका काय होती, याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान या दोन्ही महिला जोरगेवार अपक्ष आमदार स्थानापासून आणि त्यांनी स्थापन केलेल्या यंग चांदा ब्रिगेड या संघटनेच्या सक्रीय पदाधिकारी राहिलेल्या आहेत.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारातून प्रकरणाचा उलगडा

पोलिसांच्या तपासानुसार, संबंधित महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिचे मुख्य आरोपी अजय फुलझेले याच्याशी संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर आरोपीने महिलेच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारातून ती गर्भवती राहिली. प्रसूतीनंतर नवजात बालकाची विक्री करण्याचा कट रचण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

तपासादरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलीचे मुंडन करून तिची ओळख लपविण्याचा आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप पोलिसांनी केला आहे. नागपूर येथे झालेल्या प्रसूतीनंतर ‘झिरो एफआयआर’च्या माध्यमातून हे प्रकरण रामनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आणि त्यानंतर संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.

तपासाचा विस्तार

या प्रकरणात नवजात बालकांची विक्री, मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश असल्याने पोलिसांकडून सर्व संबंधितांची भूमिका तपासली जात आहे. बालक विक्रीच्या साखळीत आणखी कोणी सहभागी होते का, तसेच या प्रकरणामागे संघटित रॅकेट कार्यरत होते का, याचाही तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि त्यांच्या पथकाने केली. तपास अद्याप सुरू असून, पुढील चौकशीत आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांपासून नेत्यांसोबत फोटो

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिला सायली येरणे व भाग्यश्री हांडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच भाजपचे जिल्ह्यात आलेले मंत्री, विविध नेते, पदाधिकारीं यांच्या सोबत छायाचित्र आहेत. ही सर्व छायाचित्रे समाज माध्यमावर सार्वत्रिक झाली आहेत.