नागपूर : शहरातून जमा केल्या जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे होत नसल्यामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी नागरिकांनी अनोखी वाट अवलंबली आहे. त्यासाठी भांडेवाडी येथील कचरागृहाजवळ हे नागरिक शुक्रवारी एकत्र आले. या ठिकाणी हवा प्रदूषणाचे गांभीर्य दाखवण्यासाठी तब्बल १२ फूट उंचीचा प्रचंड असा काळा फुगा शुक्रवारी उभारण्यात आला असून, त्याद्वारे हवा प्रदूषणाचा आरोग्यावरील गंभीर परिणाम अधोरेखित करण्यात आला आहे.

या प्रचंड मोठय़ा अशा फुग्याजवळ ‘स्वच्छ हवा, स्वस्थ राहा’ हा संदेश असलेले फलक हाती घेऊन कचरा वेचणारे कामगार आणि सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलमेन्ट (सीएफएसडी) या संस्थेचे सदस्य शुक्रवारी उभे राहिले.

उत्तम आरोग्यासाठी स्वच्छ हवा गरजेची असून तो मूलभूत हक्क असल्याचे यातून ठसवण्यात आले. शहरातील नागरिक तसेच नागपूर महापालिकेने कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी शाश्वत मार्गाचा वापर करावा ही यामागची संकल्पना आहे. घरांमध्येच योग्य त्या शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण केले नाही तर शहरातील हवा प्रदूषण वाढतच जाणार असून आरोग्याची पातळीही  खालावणार असल्याचे या प्रचंड मोठय़ा फुग्याद्वारे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच शहरात कचरा जाळण्याचे प्रमाण हे शून्य असेल यासाठीही कसून प्रयत्न करावे लागतील, असे सीएफएसडीच्या संस्थापक लीना बुद्धे म्हणाल्या.  महापालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी योग्य पद्धत हाताळावी यासाठी नागरिकांच्या सहभागाने मोहीम हाती घेतल्याचे बुद्धे म्हणाल्या.

सीएफएसडीने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात नागपूरमधील ९८ टक्के नागरिकांना कचऱ्याच्या वर्गीकरणाबद्दल जाणीव आहे, पण ७८ टक्के नागरिक शहरातील कचऱ्याच्या प्रक्रिया व्यसथेबद्दल समाधानी नसल्याचे आढळले आहे.