अकोला : पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांचे विरोधात पोलीस बॉईज संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. एका कार्यक्रमासाठी अकोल्यात दाखल होत असलेल्या नितेश राणे यांच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेच्या सदस्यांनी बुधवारी दुपारी महामार्गावर काळे झेंडे दाखवले. यावेळी नितेश राणे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यातील कथित लव्ह जिहादच्या प्रकरणावर भाष्य करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केले. नितेश राणे यांनी सांगलीत बोलतांना, 'सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मस्ती कराल तर बायकोला फोनही लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू,' असा इशारा पोलिसांना दिला. हेही वाचा.नागपूर : आता ‘हे’ डॉक्टरही संपात! रुग्णांचा जीव टांगणीला… लव्ह जिहादच्या तक्रारी अर्ध्या तासात घेतल्या पाहिजेत, असे त्यांनी पोलिसांना उद्देशून ठणकावून सांगितले. नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून चांगला वाद पेटला आहे. या अगोदर त्यांनी अकोला जिल्ह्यातच 'पोलिस काय करणार आहेत, हे फक्त आमचे व्हिडीओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील,' असे वक्तव्य केले होते. नितेश राणे यांच्याकडून वारंवार पोलिसांना लक्ष्य केले जात असल्याने अकोला येथील पोलीस बॉईज संघटनेने तीव्र रोष व्यक्त केला आहे. भाजप आमदार नितेश राणे अकोला दौऱ्यावर येताच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. यावेळी तरुणांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला केले. यानंतर नितेश राणे यांचा ताफा सरळ पुढे निघून गेला. नितेश राणे यांनी पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. नितेश राणे यांनी तीन ते चार वेळा पोलीस, प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर टीका केली. हेही वाचा.प्रफुल्ल पटेलांना पराभूत करणारे भाजपचे माजी खासदार उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार ? ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चूक केली असेल त्यांना प्रत्यक्ष आमदार नितेश राणे यांनी बोलावे. या प्रकारे सरसकट पोलिसांना जाहीररित्या बोलणे चुकीचे आहे. आमदार नितेश राणे पोलिसांच्या परिवाराविषयी देखील अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करीत असतात. या संपूर्ण प्रकरणाचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे पोलीस बॉईज संघटनेच्या एका सदस्याने सांगितले. हेही वाचा.वडेट्टीवार यांचा आरोप,भ्रष्टाचाराला विरोध केल्यानेच कृषी सचिवांची बदली भाजपा आमदार नितेश राणे यांचे वक्तव्य चांगलेच अंगलट आले असून राज्यात नवा वाद निर्माण झाला. या प्रकरणात आता आमदार नितेश राणे व आंदोलन काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.