वर्धा : वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूची २ अंतर्गत संरक्षित असलेल्या पक्ष्यांची यादी वाढतच चालली आहे. अधिवास नष्ट होणे, हे त्यामागचे मुख्य कारण दिल्या जाते. माळढोक हा असाच एक पक्षी. त्याचे मानवी संगोपन करीत संवर्धन करण्याचे प्रयत्न केंद्राच्यावतीने राजस्थानात झाले. ते यशस्वी ठरले. आता असेच संगोपन करीत या पक्ष्याचे वंश संवर्धन यशस्वी ठरल्याने पक्षीप्रेमी आनंदित झाले आहे.

काळ्या मानेचा करकोचा…

या पक्षी प्रजातीचे पण विविध प्रकार आहेत. त्यात हा काळ्या मानेचा (Black – necked Stork) करकोचा. किमान ५ फूट उंचीचा. बहुतेक करकोचांना स्वरयंत्र नसते. परिणामी ते ओरडण्याऐवजी आपल्या चोची घासून आवाज काढतात. बगळ्याच्या तुलनेत यांची मान जाड, चोच लांब व मजबूत असते. पक्षीतज्ञ दर्शन दुधाने सांगतात की या पक्ष्याची एक खासियत की, नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. मात्र नर आणि मादी दोघांच्याही डोळ्याचा रंग वेगवेगळा असतो. मादीचे डोळे भडक पिवळे व नराचे काळे असतात. डोळ्याचा रंग आणि त्यावरून लैंगिक भिन्नता, असे मोजकेच अपवाद.

आता दुर्मिळ राहणार नाही

या करकोचा पक्ष्याचे संवर्धन यशस्वी ठरल्याची ही आनंदवार्ता आहे. DD News तर्फे यावर वृत्त आले आहे. गुजरातच्या जामनगर येथील प्रसिद्ध ‘खिजडिया पक्षी अभयारण्या’तून एक अत्यंत आनंददायी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जागतिक स्तरावर ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित असलेल्या या पाणथळ क्षेत्रात भारतातील एका अत्यंत दुर्मिळ आणि भव्य पक्ष्याचे नवे प्रजनन केंद्र आकारास येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘गुजरात इकॉलॉजिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ (GEER) फाउंडेशनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ‘काळ्या मानेचा करकोचा’ या दुर्मिळ पक्ष्याबाबत एक रंजक आणि महत्त्वपूर्ण उलगडा झाला आहे.

‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, खिजडिया अभयारण्यात या दुर्मिळ पक्ष्याची चार सक्रिय घरटी आढळून आली आहेत. विशेष म्हणजे, या चारही घरट्यांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण आठ पिल्लांचा यशस्वी जन्म झाला असून, १०० टक्के प्रजनन यशाची नोंद करण्यात आली आहे.

प्रदीर्घ काळ निरीक्षण

जुलै २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान ‘गीर’ फाउंडेशनच्या संशोधकांनी ३२० तासांहून अधिक काळ केलेल्या सखोल निरीक्षणादरम्यान या अभयारण्यात या पक्ष्यांची कमाल संख्या २१ नोंदवली गेली. ज्यामध्ये प्रजनन करणाऱ्या जोड्यांसह इतर प्रौढ पक्ष्यांचा समावेश होता. बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता यात दिसते.

सामान्यतः हा पक्षी घरट्यासाठी वड, पिंपळ किंवा देशी बाभळीसारख्या मोठ्या झाडांची निवड करतो. मात्र, खिजडियामध्ये या पक्ष्यांनी ‘गांडो बाभळ’ (नेल्टुमा ज्युलिफोरा) या परदेशी आणि आक्रमक प्रजातीच्या ३ ते ४.५ मीटर उंच झाडांवर घरटी बांधल्याचे दिसून आले. देशी झाडांची उपलब्धता मर्यादित असताना या पक्ष्यांनी दाखवलेली ही अनुकूलन क्षमता (Adaptability) पर्यावरणतज्ज्ञांसाठी अत्यंत अभ्यासपूर्ण ठरली आहे.

उत्कृष्ट पालकत्व आणि सुरक्षित अधिवास

संशोधनात या पक्ष्यांमधील कौटुंबिक समन्वयाचे अप्रतिम उदाहरण समोर आले. अन्नाच्या शोधात बाहेर पडताना ९४ टक्के प्रकरणांमध्ये एक पालक घरट्यात परत आल्यावरच दुसरा बाहेर पडत असल्याचे दिसले. अभयारण्यातील उथळ पाणी, मासे व इतर जलचरांची मुबलक उपलब्धता आणि मानवी हस्तक्षेपाचा अभाव यामुळे पिल्लांचा मृत्यू किंवा घरटे सोडण्याच्या एकाही घटनेची नोंद झाली नाही. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूची २ अंतर्गत संरक्षित असलेल्या या पक्ष्याचे खिजडियामधील हे यशस्वी प्रजनन भारताच्या पाणथळ परिसंस्थेच्या संवर्धनासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.