अमरावती : प्रेमात पडायला कोणताही विशिष्ट दिवस लागत नसला, तरी प्रेमाचे सेलिब्रेशन करण्याचा हक्काचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’. प्रेमाचा दिवस अशी ओळख असणारा हा दिवस नुकताच सर्वत्र साजरा झाला. पण प्रेमाच्या पलीकडे, एक बंध आहे जो अधिक खोल आहे, तो पती-पत्‍नीच्‍या नात्‍याचा. या नात्‍याला घट्ट करण्‍यासाठी गेल्‍या दोन दशंकापासून अमरावतीत अनेक दाम्‍पत्‍य संयुक्तपणे रक्‍तदान करतात. रविवारी येथील अग्रसेन भवन येथे आयोजित रक्‍तदान शिबिरात ६० च्‍या वर जोडप्‍यांनी रक्‍तदान करून पती-पत्‍नीच्‍या नात्‍यातील प्रेम अभिव्‍यक्‍त केले.

दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नजीकच्या रविवारी अमरावतीत अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. आज रायली प्लॉट परिसरातील अग्रसेन भवन येथे पुष्पादेवी व नारायणदास हेमराजानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २० व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ६० च्या वर दाम्पत्याने रक्तदान केले. यात गेल्या २० वर्षांपासून सलग संयुक्तपणे रक्तदान करणाऱ्या काही जोडप्यांचाही समावेश होता.

शिबिराला आमदार सुलभा खोडके, उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया यांनी भेट दिली.

या शिबिराच्या आयोजनासाठी हेमराजानी परिवारासोबतच अमरावती रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा, उपाध्यक्ष अजय दातेराव, प्रा. अरविंद देशमुख, श्याम शर्मा, सिमेश श्रॉफ, किसन सादानी, रितेश व्यास, हरी पुरवार, संदीप खेडकर, युसूफ बारामतीवाला, राकेश ठाकूर, सुनील अग्रवाल, योगेंद्र मोहोड, पिंटू शर्मा, उमेश पाटणकर, हितेश केडिया, किशोर शिरभाते यांनी परिश्रम घेतले.

या शिबिराला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. उन्हाळ्याची चाहूल लागताना आयोजित केल्या जाणाऱ्या या शिबिराची अनेकांना प्रतीक्षा असते. या काळात सहसा रक्तदान शिबिरांचे आयोजन होत नसते. त्यामुळे रक्ताचीही चणचण भासते. ही टंचाई दूर करण्यासाठी रक्तदान समितीची मोठी मदत होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

रक्तदान समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला. रक्तदानाच्या क्षेत्रात अमरावतीचे मोठे योगदान आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते देशाच्या राष्ट्रपतींपर्यंत अनेक मान्यवरांची या समितीने रक्ततुला केली आहे. याच श्रृंखलेत पती-पत्नींसाठी संयुक्त शिबीर का घेऊ नये, हा विचार पुढे आला. त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला. सुमारे २० वर्षांपुर्वी पहिले शिबीर घेण्यात आले.

रक्तदानाचे मोल नाही

पती-पत्नीने एकत्र येऊन रक्तदान करणे हा योग अविस्मरणीय आहे. खरे तर रक्तदानाचे मोल असूच शकत नाही. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन ही मोठी बाब आहे. या शिबिरात आम्हाला रक्तदान करण्यास मिळाले, हे भाग्य आहे, अशी भावना रितेश व्यास आणि दुर्गा व्यास यांनी व्यक्‍त केली.

Story img Loader