अकोला : नवतपात उष्णतेचा पारा चांगलाच चढला असतांना ग्रह-ताऱ्यांच्या लपंडावाचा अनोखा खेळ अवकाशात सुरू होणार आहे. ‘ब्लू मून’ आणि ग्रह-ताऱ्यांना अनुभवण्याची मोठी पर्वणी खगोलप्रेमींसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रभाकर दोड यांनी दिली.
चंद्र नेहमीपेक्षा ५.५ टक्के आकाराने लहान दिसणार
यंदा उन्हाळ्यामध्ये तापमानाने नवनवे उच्चांक गाठले. उष्णतेचा पारा प्रचंड वाढला. उन्हाळा व पावसाळा यांना जोडणारा नवतपाचे दिवस सुरू झाले आहेत. दिवसा उन्ह-सावली, तर रात्री ग्रहांची अनोखी पर्वणी बघायला मिळणार आहे. आकाशात विविध खगोलीय घडामोडी घडणार आहेत. मे महिन्याच्या शेवटी ३१ रोजी पौर्णिमा आहे. ३१ मे च्या रात्री ‘ब्लू मून’ असेल. यावेळी पृथ्वी चंद्र अंतर सुमारे २२ हजार कि.मी. अधिक असल्याने चंद्र नेहमीपेक्षा ५.५ टक्के आकाराने लहान आणि १०.५ टक्के कमी प्रकाशमान दिसेल. चंद्र मात्र निळ्या रंगाचा दिसणार नाही, असे खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी सांगितले.
तेजस्वी शुक्र आणि गुरु ग्रह एकमेकांच्या जवळ; दोन महाग्रहांची युती
सध्या सर्व ग्रह दर्शनार्थ खुले आहेत. सायंकाळी पश्चिम आकाशाची शोभा वाढवणारा तेजस्वी शुक्र आणि सर्वात मोठा गुरू ग्रह एकमेकांच्या जवळ येतांना दिसत आहेत. या दोघांनाही बुध ग्रह छान साथ देत आहे. याच वेळी पहाटे पूर्व आकाशात शनी आणि मंगळ ग्रहांचे दर्शन होते. १० जुनला शुक्र आणि गुरु या दोन महाग्रहांची युती बघता येईल. हा एक अनोखा क्षण असेल. याच कालावधीत दुर्बिणीतून शूक्र आणि बुध ग्रहांच्या संकष्टीच्या चंद्राप्रमाणे कला पाहता येतील, असेही प्रभाकर दोड म्हणाले.
आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन स्थानकाचा थरार
३० मे आणि १ जूनला रात्री ८.०४ ते ८.०९ या वेळेत आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन स्थानकाचा थरार बघता येणार आहे. क्रमाने उत्तर-पूर्व आणि पश्चिम ते दक्षिण आकाशात हे दृश्य पाहता येईल. सोबतच १ जून रोजी गुरु ग्रह कर्क राशीत, ३ जूनला चंद्र धनु राशीत व ८ जूनला सूर्य मृग नक्षत्रात येऊन पावसाळा सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. अवकाशातील या अनोख्या घडामोडी मोठी पर्वणी ठरणार असून त्याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राद्वारे केले आहे.
